हुश्श ! वर्षभर धुमाकूळ घालणारे अखेर जाळ्यात, गावकऱ्यांना सळो की पळो करून सोडले होते..
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील काही गावांमध्ये तीन बिबट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वर्षभर बिबट्यांचा धुमाकूळ सुरू असतांना आज पहाटे दोन बिबटे जेरबंद करण्यात आले आहे.
नाशिक : नाशिक शहराची ओळख खरंतर मंदिरांचे शहर, थंड हवेचे ठिकाण आणि धार्मिक नगरी म्हणून जगभरात ओळख आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर हे लेपर्ड सिटी म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. त्याचं कारण म्हणजे नाशिक शहरासह ग्रामीण भागामध्ये अनेकदा बिबट्यांचा वावर दिसून येतोय. लहान मुलांसह पशुधनावरही बिबट्याने हल्ला केला असून जण त्यात मृत्युमुखी पडले आहेत. बिबट्याची मोठ्या प्रमाणात दहशत ग्रामीण भागात बघायला मिळत आहे. याच दरम्यान काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर मध्ये दोन लहान मुलींचा बिबट्याने हल्ला करत जीव घेतला होता. त्यावरून बिबट्या नरभक्षक असल्याचा संशय आल्याने त्याला जेरबंद करण्यासाठी 18 पिंजरे लावण्यात आले आहे. तिकडे यश येत नसतांना वनविभागाला सिन्नर मध्ये मोठे यश आले आहे.
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील शिंदे आणि जाखोरीमध्ये एकाच पहाटे दोन बिबटे जेरबंद करण्यात आले आहे. वर्षभर धुमाकूळ घालणारे दोन बिबटे अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दोन्ही ठिकाणचे बिबटे हे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात पहाटेच्या वेळेला जेरबंद झाले आहे. त्यामध्ये बिबट्याने अक्षरशः नागरिकांना सळो की पळो करून टाकले होते. रात्रीच्या वेळेला घराच्या बाहेर पडण्याची हिंमत राहिली नव्हती.
बिबट्याच्या भीतीने शेतकरी शेतात रात्रीच्या वेळी पाणी भरू शकत नव्हता. त्यामध्ये शेतकरी हा धास्तावला होता. यामध्ये अनेक जनावरांनाही बिबट्याने लक्ष केले होते. त्यामुळे नागरिकांकडून वेळोवेळी वनविभागाकडे पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली जात होती.
मात्र, बिबट्या पिंजऱ्यात अडकत नव्हता, तब्बल वर्षभर बिबट्याने वनविभागाला चकवा दिला जात होता. त्यात आज पहाटे बिबट्या दोन्ही ठिकाणी जेरबंद झाला आहे. यामध्ये शिंदे गावातील बबन महादेव जाधव यांच्या खोकडीचा मळा येथे शेतात बिबट्या जेरबंद करण्यात आला तर
तर दुसरीकडे जाखोरी येथे बबलू सय्यद यांची शेती आहे. मागील महिण्यात त्यांना 3 बिबटे दिसले होते. त्यानंतर पिंजरा लावण्यात आला होता. तेव्हा त्यातील एक बिबट्या जेरबंद करण्यात आला होता. त्यातील एक आज पहाटे जेरबंद झाला असून अद्यापही एक बिबट्या जेरबंद झालेला नाही.
त्यामुळे काही अंशी नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी ग्रामीण भागातील बिबटयाची दहशत कायम आहे. त्यामध्ये वनविभागाने आणखी पिंजरे लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ कायम करीत असले तरी वर्षभर धुमाकूळ घालणारे दोन बिबटे जेरबंद झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.