जरांगे यांच्या नादाला लागणं भोवलं? Chhagan Bhujbal यांना मोठा धक्का; बड्या नेत्याने सोडली साथ
छगन भुजबळ यांना मराठा आरक्षणावर विधानं करणं भोवलं आहे. या मुद्दयावरून मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांना टार्गेट केलं. त्यानंतर भुजबळांच्या मराठा समर्थकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. भुजबळांच्या एका खंद्या समर्थकाने तर थेट...
उमेश पारीक, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नाशिक | 21 ऑक्टोबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचा ओबीसीत समाजात समावेश करण्याची आणि मराठ्यांना आरक्षण देण्याची जोरदार मागणी केली आहे. जरांगे पाटील यांच्या या मागणीला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं. आमचा त्याला विरोध नाही. पण ओबीसीतून त्यांना आरक्षण देऊ नये. आमचा त्याला विरोध राहील, असं छगन भुजबळ यांनी वारंवार सांगितलं. जरांगे पाटील यांनी यावरून भुजबळांना प्रत्येक सभेत टार्गेट केलं. भुजबळ यांची ही विधाने त्यांच्या चांगलीच अंगलट आली आहेत. भुजबळांच्या समर्थक मराठा पदाधिकाऱ्यांनी बंडाचं निशाण फडकवल्याने भुजबळांची डोकेदुखी वाढली आहे.
छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेतल्याने भुजबळांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी भुजबळांची साथ सोडली आहे. जयदत्त होळकर हे भुजबळांचे खंदे समर्थक आहेत. त्यांनीच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळांची साथ सोडल्याने भुजबळांच्या अडचणी वाढल्या आहेत.
भुजबळांची दमछाक होणार
जयदत्त होळकर हे राष्ट्रवादीचे प्रांतिक सरचिटणीस आहेत. त्यांनी या पदाचाही राजीनामा दिला आहे. मराठा आरक्षणाला मंत्री भुजबळ विरोध करत असल्याने मी राजीनामा दिला आहे. निफाड तालुका पूर्व 46 गाव तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. पुढे आता फक्त मराठा समाजासाठी काम करण्याची भूमिका घेतली आहे. मराठा समाजाचा झेंडा हाती घेतला आहे, अशी प्रतिक्रिया होळकर यांनी व्यक्त केली आहे.
भुजबळ यांचे समर्थक असलेल्या मराठा नेत्यांनीच भुजबळांच्या विरोधात उघड भूमिका घेतली आहे. थेट राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लासलगावसह 46 गावातून मतांची गोळबेरीज करताना होणार भुजबळांची चांगलीच दमछाक होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
नादाला लागणं भोवलं
मनोज जरांगे पाटील यांच्या नादाला लागणं भुजबळ यांना भोवल्याचं सांगितलं जात आहे. मराठ्यांना ओबीसीत आरक्षण देऊ नये, अशी अनेक नेत्यांनी मागणी केली होती. मराठ्यांचा ओबीसीत समावेश करण्यास विरोध केला होता. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनीही मराठ्यांचा ओबीसीत समावेश करण्यास विरोध केला आहे.
तसेच मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नसल्याचं अनेकदा स्पष्ट केलं आहे. मात्र, जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणातून फक्त भुजबळ आणि प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांना नाव घेऊन वारंवार टार्गेट केलं आहे. त्यामुळे भुजबळ यांच्या विरोधात रोष निर्माण झाल्यानेच पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरु केल्याचं सांगितलं जात आहे.