“बाळासाहेबांनी सत्व आणि तत्व न सोडण्याची शिकवण दिली, पण या विकाऊ माणसांबद्दल काय बोलावं”
शिवसेना ठाकरेगटाचे नेते अरविंद सावंत यांनी शिंदेगटावर टीका केली आहे. काय म्हणालेत? पाहा...
मुंबई : शिवसेना ठाकरेगटाचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी शिंदेगटावर घणाघाती टीका करण्यात आली आहे. काही लोकांना विनाशकाली विपरीत बुद्धी असते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला तत्वाशी बांधील राहण्याची शिकवण दिली. सत्व आणि तत्व न सोडण्याची शिकवण दिलीय. पण शिंदेगट (Cm Eknath Shinde) सारं विसरला आहे, असं म्हणत अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी शिंदेगटावर टीका केली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पण तसंच सांगितलंय, ‘लढाऊ होऊ व्हावं, पण विकाऊ होऊ नका’ त्यामुळे विकाऊ होणाऱ्या माणसांबद्दल काय बोलावं?, असं सावंत म्हणालेत.
अरविंद सावंत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही टीका केली आहे. त्यांना दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळं दिसतात. पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळं दिसत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलेला लक्षात राहत नाही. महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंचा अवमान केलेला लक्षात राहत नाही. त्यामुळे ते कुसळं शोधत असतात, असं सावंत म्हणालेत.
आता चंद्रशेखर बावनकुळेंना म्हणावं, तिकडे जाऊन नतमस्तक व्हा. ‘औरंगजेबजी मैं आया हूं!’ असं काहीतरी त्यांना बोलावं लागेल. त्यांनी आता औरंगजेबच्या चरणी नतमस्तक व्हावं, असं अरविंद सावंत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना टोला लगावला आहे.
सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेवरही भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर फिरणार आहेत. त्यांनी बुलढाण्यात सभा घेतली. तिकडून आता इकडे नाशिकला सभा होईल. या लोकांनी आदरणीय उद्धव साहेबांना जी वागणूक दिली, त्याबद्दल प्रचंड चीड जनतेच्या मनात आहे. ती मताच्या रुपाने बाहेर पडेल, असं सावंत म्हणालेत.