‘मालेगाव मिनी पाकिस्तान आहे हे आम्ही काल म्हटलो, आजही बोलतो आणि पुढेही बोलू’, नितेश राणे यांचं वक्तव्य
नितेश राणे यांनी मालेगावचा उल्लेख 'मिनी पाकिस्तान' असा केल्यामुळे त्यांच्याविरोधात काही पक्षांनी पोलिसात तक्रार दाखल करण्याचा इशारा दिलाय. त्यांना काही पक्षांनी त्यासाठी नोटीसही बजावली आहे. त्यावर नितेश राणे यांनी आज भूमिका मांडली.
मनोहर शेवाळे, Tv9 प्रतिनिधी, मालेगाव | 6 फेब्रुवारी 2024 : भाजप आमदार नितेश राणे यांना मालेगावला मिनी पाकिस्तान म्हटल्यानंतर माफी मागावी, अशी नोटीस विविध पक्षांनी पाठवली आहे. त्यांच्या वक्तव्याचा मालेगावात निषेध करण्यात आला आहे. या नोटीसनंतर नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. नितेश राणे यांनी 319 कोटींच्या वीज चोरीचा संदर्भ देत वीज चोरीचा हा पैसा हिंदू विरोधी कारवाया करण्यासाठी वापरला जात असल्याचा आरोप केला होता. त्याचे पडसाद मालेगावात उमटल्यानंतर शहरातील अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी राणेंना नोटीस पाठवल्या होत्या. त्यास उत्तर म्हणून आज नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नोटीस पाठवणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं.
नितेश राणे यांनी मालेगावात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या त्यावेळचा एक व्हिडिओ माध्यमांवर पुरावा म्हणून दिला आहे. तसेच “मालेगाव मिनी पाकिस्तान म्हणण्याची वेळ का आली? ह्याचा पुरावा मी दिलाय. तिथे राष्ट्रवाद कमी आणि पाकिस्तानचा गवगवा होत असेल, तो असिफ शेख माजी आमदार आहे की पाकिस्तानचा एजंट आहे? आम्ही मालेगावला पाकिस्तान होण्यापासून वाचण्याचा प्रयत्न करतो. मी चुकीचं बोललो नाही. मी माफी मागणार नाही. कायदेशीर उत्तर देईन”, असं नितेश राणे म्हणाले.
‘आम्ही काल बोलत होतो, आजही बोलतो आणि पुढेही बोलू’
काही दिवसांअगोदर मालेगाव शहरात 300 कोटी पेक्षा जास्त वीज चोरीचे सत्य मी मांडले होते. त्यावेळी आमची बैठक झाली होती. आता अभिमानाने मी सांगतो त्या बैठकीचे पडसाद मालेगावमध्ये पाहायला मिळत आहेत, असं नितेश राणे म्हणाले. “मी मालेगावचा उल्लेख पाकिस्तान म्हणून केला होता. त्यामुळे अनेकांना मिरचा झोंबल्या. मालेगावमध्ये राहून पाकिस्तानचे नारे कोणी देत असतील तर आम्ही काल बोलत होतो, आजही बोलतो आणि पुढेही बोलू”, असं नितेश राणे म्हणाले.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगावात राजकीय घडामोडी वाढू लागल्या आहेत. मालेगावात शिवसेनेचे नेते दादा भुसे यांचं चांगलं वर्चस्व आहे. तसेच ठाकरे गटाचं देखील इथे वर्चस्व आहे. त्याशिवाय भाजपही या ठिकाणी प्रयत्न करताना दिसत आहे. आगामी काळात इथे कोण बाजी मारतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.