बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनीच विमानतळाला स्वत:चं नाव नाकारलं असतं; छगन भुजबळांची वादाला फोडणी?

| Updated on: Jun 11, 2021 | 1:48 PM

नवी मुंबई विनानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याची मागणी स्थानिक भूमिपुत्रांनी केली आहे. त्यावर या विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे.

बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनीच विमानतळाला स्वत:चं नाव नाकारलं असतं; छगन भुजबळांची वादाला फोडणी?
chhagan bhujbal
Follow us on

चंदन पुजाधिकारी, टीव्ही9 मराठी, नाशिक: नवी मुंबई विनानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याची मागणी स्थानिक भूमिपुत्रांनी केली आहे. त्यावर या विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे. मात्र, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी विमानतळाला स्वत:चं नाव देणं नाकारलं असतं, असं सांगून नव्या वादाला फोडणी दिली आहे. त्यामुळे नामकरणासाठी लढणाऱ्या स्थानिक भूमिपुत्रांच्या मागणीला बळ मिळण्याची शक्यता असून नामकरणाच्या मुद्दयावरून आघाडीत बिघाडी असल्याचं समोर आलं आहे. (chhagan bhujbal reaction on Navi Mumbai International Airport Name Issue)

छगन भुजबळ यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना हे विधान केलं आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी स्वत:चं नाव विमानतळाला देणं नाकारलं असतं. जे. आर. डी. टाटा यांचं नाव विमानतळाला सूचवलं असतं, असं सांगतानाच नामकरण वाद एकत्र बसून सोडवावा, असा सल्ला भुजबळ यांनी दिला आहे. मात्र, हे सांगतानाच बाळासाहेब आणि दि.बा. पाटील या दोन्ही नावाला आमचा पाठिंबा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भुजबळ यांनी थेट नामकरणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला सुनावतानाच नरो वा कुंजरोवा भूमिका घेतली आहे. त्यामुळे हा वाद चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

वाघ पंजाही मारू शकतो

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवरही भाष्य केलं. राज्याचे अनेक प्रश्न केंद्राकडे आहेत. त्यामुळे जमवून घ्यावच लागतं. मैत्री करायची की नाही हे वाघाच्या मनावर आहे. वाघ पंजाही मारू शकतो, असा चिमटाही त्यांनी भाजपला काढला.

राजे सुज्ञ आहेत

खासदार संभाजी छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. मराठा आरक्षण आंदोलनाला विरोध नाही. कोरोना पार्श्वभूमीवर आंदोलन कसं करावं हे आम्ही काय सांगणार? राजे सुज्ञ आहेत. संभाजीराजे सावध पावलं टाकत आहेत, असं सांगतानाच ते राजे आहेत. आम्ही शाहू, फुले, आंबेडकरांचे भक्त आहोत, असं ते म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण देताना इतरांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मराठा आरक्षण मोर्चामुळे ओबीसींनी विचलित होण्याचं कारण नाही. अखेर हा प्रश्न सुप्रीम कोर्टात सुटणार आहे, असंही ते म्हणाले.

पवार सल्ला नक्कीच ऐकतील

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या भेटीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रशांत किशोर यांनी अनेक राजकीय पक्षांना सल्ले दिले. त्यामुळे या राजकीय पक्षांना यशही मिळाले आहे. निवडणुकीच्या रणनीतीत त्यांचा हातखंडा आहे. त्यांनी काही सल्ला दिला तर पवार साहेब नक्कीच ऐकतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (chhagan bhujbal reaction on Navi Mumbai International Airport Name Issue)

 

संबंधित बातम्या:

बाळासाहेब की दि. बा. पाटील?, राज्य सरकारचं ठरलं, नवी मुंबई विमानतळाच्या नावाबद्दल मोठा निर्णय!

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या; प्रकाश आंबेडकरांचीही मागणी

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याची आग्रही मागणी, रायगड ते नवी मुंबई मानवी साखळी

(chhagan bhujbal reaction on Navi Mumbai International Airport Name Issue)