Gautami Patil | गौतमी पाटील हिची काळजाला भिडणारी प्रतिक्रिया, ‘त्या’ व्हिडीओवर पहिल्यांदाच बोलली
गौतमी पाटीलने तिच्या व्हायरल झालेल्या आक्षेपार्ह व्हिडीओवर आज प्रसारमाध्यमांसमोर पहिली प्रतिक्रिया दिली. तिची ही प्रतिक्रिया शांततेत ऐकल्यावर ती आतून किती खचलीय याची प्रचिती येईल. पण तरीही ती आज परिस्थितीला सामोरं जाताना दिसत आहे.
नाशिक : खान्देशातील छोट्या गावात जन्म घेणारी एक मुलगी आपल्या आईसोबत पुण्यात जाते. तिथे लहानाची मोठी होते. डान्स क्लासला जाते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी पुढे ऑर्केस्ट्रा आणि इतर माध्यमातून काम सुरु करते. हळूहळू सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धीस येते. त्यानंतर प्रचंड लोकप्रियदेखील होते. त्यामुळे अनेकांची दुकानं बंद होतात. त्यातून तिच्याबद्दल असूया भावना निर्माण होते आणि थेट तिचं करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जातो. डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) सध्या कोणत्या मानसिक त्रासातून जातेय याची आपण कल्पनादेखील करु शकणार नाही. गेल्या आठवड्यात ज्या काही घडामोडी घडल्या त्यामुळे ती आतून पूर्णपणे खचलीय. पण तरीही ती परिस्थितीला तोंड देत उभी राहिलीय. विशेष म्हणजे फक्त उभीच राहिली नाही तर ती परिस्थिचा सामना करतेय. तिने आज प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेतून तेच समोर येतंय.
गौतमी पाटीलने आज नाशिक येथील कार्यक्रमादरम्यान प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. गौतमी पाटील पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान कपडे बदलवत असताना कुणी समाजकंटकाने तिचं चोरुन चित्रिकरण केलेलं. त्यानंतर संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेला. या व्हिडीओ प्रकरणावरुन सोशल मीडियावर गौतमीच्या चाहत्यांनी प्रचंड रोष व्यक्त केलेला. या व्हिडीओवरुन प्रचंड मोठा वाद निर्माण झालेला. अनेकजण गौतमीच्या पाठिमागे खंबीरपणे उभे राहिले. या सगळ्या वादानंतर गौतमी आज पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर आली. यावेळी तिने संबंधित प्रकारावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली. तिची प्रतिक्रिया खूप बोलकी आहे.
“माझी बोलण्याची मनस्थिती नाहीय. पण तरीही मी आज तुमच्यासमोर आलीय”, असं एका वाक्यात गौतमीने आपल्यासोबत घडलेल्या प्रकरावर प्रतिक्रिया दिली. गौतमीच्या मनात जो काहूर सुरुय याबद्दल ती उघडपणे बोलूही शकत नाहीय. याशिवाय अशा परिस्थितीला सामोरं जाण्याचं धाडस ती करतेय. विशेष म्हणजे या कठीण परिस्थितीत तिच्या चाहत्यांनी तिला चांगली साथ दिलीय. त्यामुळे तिने याबद्दल समाधान व्यक्त केलं. “लोकं आपल्यासोबत आहेत या गोष्टीचं अभिमान वाटतोय. आपल्याला त्यांची साथ आहे, या गोष्टीचं खूप छान वाटतंय”, असं गौतमी बोलली. याशिवाय पोलीस तपास करत आहेत. आरोपींवर कारवाई होईल, अशी माहिती देखील गौतमीने यावेळी दिली.
राज्य महिला आयोग गौतमीच्या पाठिशी
राज्य महिला आयोग गौतमी पाटीलच्या पाठिशी खंबीरपणे उभं आहे. त्यावर गौतमीने प्रतिक्रिया दिली. “महिला आयोग माझ्यासोबत आहे त्याबद्दल बरं वाटलं”, असं गौतमी पाटील म्हणाली. दरम्यान, महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरिता कृती कार्यक्रम जाहीर करावा असे महिला आयोगाने सायबर विभाग, पोलीस महानिरीक्षक यांना पत्राद्वारे कळवले आहे”, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली होती.