महाराष्ट्र केसरीत गतविजेता नाशिकच्या सदगीरचा धक्कादायक पराभव; एकेरी पटावर पुण्याच्या कोकाटेची बाजी
गादी गटात हर्षवर्धन सदगीर विरूध्द हर्षल कोकाटे यांच्यात कुस्ती झाली. त्यात हर्षवर्धनला हर्षलने चक्क सात-पाच अशी धूळ चारली. हर्षवर्धन आक्रमक खेळी करेल अशी आशा होती. मात्र, त्याने चाहत्यांची निराशा केली.
साताराः सातारा येथे सुरू असलेल्या 64 व्या महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) स्पर्धेत गतविजेता असणाऱ्या नाशिकच्या (Nashik) हर्षवर्धन सदगीरला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्याला पुण्याच्या (Pune) हर्षल कोकाटेने एकेरी पटावर 7 विरुद्ध 5 अशा गुणांनी धूळ चारली. त्यामुळे हर्षवर्धनला गादी गटातून सेमिफायनलमध्येच माघारी परतावे लागले आहे. हर्षवर्धनने पुण्यातील बालेवाडीत पार पडलेल्या 63 व्या कुस्ती स्पर्धेतलातूरच्या शैलेश शेळकेवर 3-2 ने विजय मिळवत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला होता. विशेष म्हणजे विजयी होताच त्याने उपविजेत्या शेळकेला खांद्यावर घेऊन त्याचे अभिनंदन करत खिळाडूवृत्तीचे दर्शन घडवले होते. यंदाही तोच बाजी मारणार याची उत्सुकता नाशिककरांना आणि समस्त महाराष्ट्राला होती. मात्र, या पराभवाने त्याची दावेदारी संपुष्टात आली आहे. हर्षवर्धन हा नाशिकचा पैलवान आहे. त्याचे वडील शाळेत क्लर्क आहेत. त्याने सुरुवातीला नाशिकच्या बलकवडे आखाड्यात आणि नंतर पुण्यात काका पवारांकडे कुस्तीचे धडे गिरवले. काका पवारांचा शिष्य आणि आक्रमक खेळाडू ही त्याची विशेष ओळखय.
कशी झाली लढत?
गादी गटात हर्षवर्धन सदगीर विरूध्द हर्षल कोकाटे यांच्यात कुस्ती झाली. त्यात हर्षवर्धनला हर्षलने चक्क सात-पाच अशी धूळ चारली. हर्षवर्धन आक्रमक खेळी करेल अशी आशा होती. मात्र, त्याने चाहत्यांची निराशा केली. एकेरी पटावर कोकाटेने त्याला चित केले. खरे तर महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शुक्रवारी पावसामुळे व्यत्यय येऊन उपांत्य फेरीच्या लढती रद्द कराव्या लागल्या होत्या. या स्पर्धेत बाजी कोण मारणार याची उत्सुकता लागली आहे.
पावसाचे थैमान सुरू
सातारा जिल्हा क्रीडा संकुलात या स्पर्धा सुरू आहेत. मात्र, अवकाळी पावसाचा तडाखा येथे बसतोय. शुक्रवारी सायंकाळी झालेल्या पावसाने कुस्तीचा आखाडा आणि विजेच्या टॉवरचे नुकसान झाले आहे. सगळीकडे चिखल झाला आहे. शाहू स्टेडियममध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. आखाड्यातील माती, मॅट भिजल्याने लढती रद्द कराव्या लागल्या होत्या. आता उर्वरित महत्वाच्या लढती तरी निर्विघ्न पार पडाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय. इतर बातम्याः