Nashik News : धोंड्याच्या महिन्यात घरी आलेल्या लेकीसह आईचा वीजेचा शॉक लागून मृत्यू, जावई आणि नातवंडं बचावले !
सध्या धोंड्याचा महिना असल्याने प्रथेप्रमाणे मुलगी आणि जावई जेवायला माहेरी आले होते. पण हा आनंद फार काळ टिकला नाही.
चंदन पुजाधिकारी, चैतन्य गायकवाड, टीव्ही 9 मराठी, नाशिक / 7 ऑगस्ट 2023 : धोंड्याच्या महिन्यात घरी जेवायला आलेल्या मुलीसह आईचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली. पेरु तोडण्यासाठी गच्चीवर गेल्या असताना उच्च दाबाच्या वीजवाहिनीचा शॉक लागला. नाशिकच्या ओझर नगरातील दत्तनगर येथे ही दुर्दैवी घटना घडली. यावेळी जावयासह दोन नातवंडे लांब फेकले गेल्याने सुदैवाने बचावले आहेत. मीना हनुमंत सोनवणे आणि आकांक्षा राहुल रणशूर असे शॉक लागून मृत्यू झालेल्या मायलेकींची नावे आहेत. घटनेची माहिती कळताच तातडीने घराकडे निघालेला मुलाचा देखील अपघात झाला असून, यात तो गंभीर जखमी जखमी झाला आहे. याप्रकरणी ओझर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे घरांवरील वीज तारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
काय घडलं नेमकं?
अधिक मासात मुलगी आणि जावयाला घरी जेवायला बोलावण्याची प्रथा आहे. प्रथेनुसार सध्या अधिक मास सुरु असल्याने मीना सोनावणे यांनी आपली मुलगी आकांक्षा रणशूर, जावई राहुल रणशूर आणि दोन नातवंडांना घरी जेवायला बोलावले होते. मायलेकी घराच्या गच्चीवर उभ्या राहून पेरू तोडायला गेल्या. यावेळी हातातील रॉडचा घरावरुन गेलेल्या उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांना स्पर्श झाला. यात मीना आणि आकांक्षा या मायलेकीचा जागीच मृत्यू झाला. तर जावई आणि दोन नातवंडे शॉकमुळे लांब फेकले गेल्याने सुदैवाने बचावले.
मुलगा अपघातात गंभीर जखमी
जावयाने आरडाओरडा केल्याने कॉलनीतील लोकांनी तात्काळ धाव घेतली. लोकांनी तात्काळ ओझर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले. दरम्यान, घरी घडलेल्या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच घराकडे निघालेल्या मुलाचा वाटेत अपघात झाला. या अपघातात मुलगा गंभीर जखमी झाला आहे.