Nashik Illegal Dargah : नाशिकमध्ये अनधिकृत दर्गा तोडायला सुरुवात, पोलिसांवर दगडफेक, वाहनांची तोडफोड
Nashik Illegal Dargah : नाशिकमध्ये अनधिकृत दर्ग्याच्या तोडकामाला सुरुवात झाली आहे. मात्र रात्रीच्या सुमारास जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. काही पोलीस यामध्ये जखमी झाले. पाच वाहनांचेही नुकसान केले.

नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील अनधिकृत दर्ग्याच्या तोडकामाला आज पहाटेपासून सुरुवात झालेली आहे. आपलं म्हणणं मांडण्यासाठी दर्गा ट्रस्टला दिलेली मुदत आज संपली. त्यामुळे दर्ग्याच्या उर्वरित बांधकामाच्या तोडकामाला सुरुवात झाली आहे. याआधी हाच अनधिकृत दर्गा हटवताना निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, नाशिक पोलिसांनी काठे गल्ली परिसरात मोठा बंदोबस्त लावला आहे. पोलिसांकडून अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची खबरदारी पोलिसांकडून घेण्यात येत आहे. अनधिकृत दर्ग्याच्या उर्वरित तोडकामाला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी अनधिकृत दर्गा हटवण्याची प्रोसेस सुरु झाली. त्यावेळी धर्मगुरुंनी मध्यस्थी करुन अजून अवधी हवा अशी विनंती केली होती.
15 एप्रिल रोजी ही मुदत संपल्यानंतर पोलीस बंदोबस्तात महापालिकेकडून तोडक कारवाई सुरु झाली आहे. जिथे ही कारवाई सुरु आहे, तिथे 100 मीटरच्या परिसरात बॅरिकेडींग करण्यात आली आहे. आतमध्ये जायची कोणाला परवानगी नाहीय. आज दुपारपर्यंत हा अनधिकृत दर्गा हटवण्याचं काम पूर्ण होईल. मागच्यावेळी दर्गा हटवण्याची कारवाई सुरु झाली. त्यावेळी दोन्ही बाजूकडून जमाव जमला होता. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. आज अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे.
मात्र, जमाव 400 च्या वर होता
दरम्यान हा दर्गा हटवण्याची कारवाई सुरु होण्याआधी रात्रीच्या वेळी नाशिकच्या काठे गल्ली परिसरात दगडफेक झाली. तीन ते चार पोलीस या दगडफेकीत जखमी झाले आहेत. पाच वाहनांचेही नुकसान झाले आहे. वीजपुरवठा खंडित असल्याचं पाहून जमावाने दगडफेक केली. वादग्रस्त धार्मिक स्थळाबाबत अफवा उडल्यानं तणाव निर्माण झाला होता. रात्रीच्या वेळी 500 पोलिसांचा बंदोबस्त होता. मात्र, जमाव 400 च्या वर होता. पालिकेने न्यायालयाच्या आदेशाने अनधिकृत दर्ग्याला 1 एप्रिलला नोटीस बजावली होती. स्वतःहून अनधिकृत बांधकाम काढून घ्या, अन्यथा तोडकामाचा दिला होता इशारा. नाशिक पोलिसांनी परिसरातील वाहतूक मार्गतही केला बदल