नाशिकमधील तांदूळ घोटाळाप्रकरणी बचत गटाची रक्कम गोठवा; चौकशी समितीची संचालकांना शिफारस
नाशिकमधील पोषण आहारातील तांदूळ हडपल्याच्या प्रकरणाची ‘एसआयटी’मार्फत चौकशी करावी, अशी मागणी करत भाजप आमदार राम सातपुते यांनी विधिमंडळात लक्षवेधी मांडली आहे. त्यानंतर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी वस्तुस्थिती सांगणारा अहवाल शासनाला पाठवला. आता याप्रकरणी आमदार सातपुते थेट पोषण आहार संचालकांना हा तांदूळ विक्रीसाठी कोठे जात होता. यापूर्वीचा तांदूळ आणि अन्य साठ्याचे काय झाले, याची माहिती मागण्याची तयारी सुरू केलीय. त्यामुळे या प्रकरणाची पाळेमुळे खणली जाणार आहेत.
नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) पोषण आहारातील तांदूळ (Rice) हडपल्याप्रकरणी विवेकानंद महिला बचतगटाची अनामत रक्कम जप्त करावी, अशी शिफारस जिल्हा परिषद (ZP) आणि महापालिकेच्या चार सदस्यीय शिक्षण समितीने शिक्षण संचालकांकडे पाठवलेल्या अहवालात केली आहे. नाशिक जिल्ह्यात शासनाच्या आदेशाचा आधार घेत बचत गटांना बाजूला सारून 13 कंत्राटदारांना सेंट्रल किचन अंतर्गत मुलांना पोषण आहार देण्याचे काम देण्यात आले होते. पंचवटीतील गुंजाळबाबा नगर येथे निफाड येथील स्वामी विवेकानंद संस्थेच्या कंत्राटदाराकडे हे काम देण्यात आले. मात्र, कंत्राटदार हृषीकेश चौधरी याने तब्बल 281 पोते तांदूळ म्हणजे 15 हजार किलोच्या धान्यावर डल्ला मारला होता. याची माहिती महिला बचत गटाला समजली. तेव्हा त्यांनी तपासणीसाठी आलेल्या प्राथमिक शिक्षण संचालयाच्या पथकाला माहिती दिली. मात्र, त्यावर कारवाई झाली नाही. शेवटी त्यांनी महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्याकडे कैफियत मांडली. तेव्हा धनगर यांनी या ठिकाणी धडक देत हे प्रकरण चव्हाट्यावर आणले. विशेष म्हणजे हा तांदूळ आपलाच असल्याची कबुली कंत्राटदार हृषीकेश चौधरी याने शिक्षणाधिकाऱ्यांना दिली होती.
समितीच्या अहवालात काय?
नाशिकमधील तांदूळ घोटाळ्याच्या चौकशीवरून बराच काळ टोलवाटोलवी सुरू होती. मात्र, अखेर जिल्हा परिषद आणि महाालिकेच्या चार सदस्यीय शिक्षण समितीने या प्रकरणाची चौकशी केली. समितीने प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट दिली. कंत्राटदाराची चौकशी केली. त्यांनंतर स्वामी विवेकानंद संस्थेच्या कंत्राटदाराने तांदूळ साठा दडवल्याचा निष्कर्ष काढला. या प्रकरणी या संस्थेचा करार रद्द करावा. त्यांच्याकडून शासकीय दराने शिल्लक तांदळाची वसुली करावी. त्यांना भविष्यात अन्न शिजवून पुरवठाण करण्यासह इतर कोणतेही काम देऊ नये. संस्थेच्या अनामत रकमेसह इतर सर्व जमा शासनदरबारी जमा करावी, अशी शिफारस करण्यात आली आहे. यावर शिक्षण संचालक काय निर्णय घेतात हे पाहावे लागेल.
प्रकरणाची पाळेमुळे खणणार
पोषण आहारातील तांदूळ हडपल्याच्या प्रकरणाची ‘एसआयटी’मार्फत चौकशी करावी, अशी मागणी करत भाजप आमदार राम सातपुते यांनी विधिमंडळात लक्षवेधी मांडली आहे. सातपुते यांनी याबाबत एक पत्र लिहिले आहे. त्यात ते म्हणतात की, नाशिकमध्ये महिला बचतगटांच्या सदस्यांनी हिरावाडीतील ठाकरे मळा परिसरात 15 हजार किलो दडवलेल्या तांदूळ साठ्याचा भांडाफोड केला. या तांदळातून सव्वालाख विद्यार्थ्यांची भूक लागली असती. हा तांदूळ आपलाच असल्याची कबुली स्वामी विवेकानंद संस्थेचे ऋषिकेश चौधरी यांनी दिली. तरीही त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे याप्रकरणाची एसआयटी नेमून चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यानंतर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी वस्तुस्थिती सांगणारा अहवाल शासनाला पाठवला. आता याप्रकरणी आमदार सातपुते यांनी थेट पोषण आहार संचालकांना हा तांदूळ विक्रीसाठी कोठे जात होता. यापूर्वीच्या तांदूळ आणि अन्य साठ्याचे काय झाले, याची माहिती मागण्याची तयारी सुरू केलीय. त्यामुळे या प्रकरणाची पाळेमुळे खणली जाणार आहेत.
इतर बातम्याः