नाशिकचे नवे जिल्हाधिकारी आक्रमक; औषध विक्रेत्यांना सीसीटीव्ही लावणे केले अनिवार्य, का दिले आदेश?
नाशिकमधील सर्व औषध विक्रेत्यांनी आपल्या दुकानात सीसीटीव्ही लावावेत. या आदेशाचे जिल्ह्यातील सर्व विभाग आणि नाशिक ग्रामीण हद्दीतील सर्व औषध विक्रेते दुकानदार यांना पालन करणे बंधनकारक आहे. अन्यथा कोणाचीही गय न करता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिला आहे.
नाशिकः राज्याच्या शिक्षण आयुक्तपदी नियुक्ती झालेल्या सूरज मांढरे यांच्या जागी नवे जिल्हाधिकारी म्हणून आलेले गंगाथरन डी. हे पदभार स्वीकारल्यानंतर लगेच अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी नाशिकमधील (Nashik) औषध विक्रेत्यांना एक महिन्याच्या आत सीसीटीव्ही (CCTV) लावणे अनिवार्य केले आहे. अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. मुलांमधील अंमली पदार्थांचा गैरवापर व अंमली पदार्थांच्या अवैध तस्करीला प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. येणाऱ्या काळात अशा अनुचित घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी कारवाई प्रभावीपणे राबवली जाईल, अशी तंबीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मालेगावपर्यंत ड्रग्ज विक्रीची धागेदोरे जोडले गेल्याचे समोर आले होते. नाशिकमधील अनेक भागातही सर्रास ड्रग्ज विक्री होते. तरुण मुलांना या व्यसनाच्या जाळ्यात ओढले जाते. अनेक विद्यार्थी औषधे, गोळ्या, व्हाइटनरची नशा करतात. त्यामुळए ऐन तारुण्यात ते वाममार्गाकडे वळतात. हे टाळण्यासाठी जिल्हाधिकारी आक्रमक झाले आहेत.
नेमका आदेश काय?
जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, शेड्युल एक्स (Schedule X, H व H1), एच व एच 1 औषधे व इन्हेलर विकणाऱ्या औषध विक्रेत्यांनी अंमली पदार्थ विरोधी कारवाई प्रभावीपणे हाताळण्यासाठी मदत व्हावी या हेतुने, संयुक्त कृती आराखड्यामध्ये नमूद केल्यानुसार फौजदारी प्रक्रिया 1973 चे कलम 133 अन्वये यासंदर्भात सदरचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचे व्यावसायिकांनी तंतोतंत पालन करावे. शेड्युल एक्स, एच व एच.1 औषधे व इन्हेलर विक्री करणारे औषधे विक्रेते यांनी त्यांच्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अनिवार्य आहे. त्यांनी आपल्या दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे दर्शनी भागात लाववेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
पडताळणी कोण करणार?
जिल्हा औषध नियंत्रण विभागाने नाशिक ग्रामीण विभागातील सर्व औषध विक्रेते दुकानादारांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत किंवा नाही याबाबत पडताळणी करावी. हे आदेश दिलेल्या दिनांकापासून (23 मार्च 2022) सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी सर्व औषध विक्रेते दुकानदारांना एक महिन्याचा कालावधी देण्यात येत आहे. या कालावधीत औषध विक्रेते दुकानदारांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले नसल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या आदेशाचे जिल्ह्यातील सर्व विभाग आणि नाशिक ग्रामीण हद्दीतील सर्व औषध विक्रेते दुकानदार यांना पालन करणे बंधनकारक असल्याचेही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी म्हटले आहे.
काय आहेत आदेशाची वैशिष्ट्ये?
– अंमली पदार्थ विरोधी मोहीम अधिक कठोर
– जिल्हाधिकारी गंगाथरन डी. आक्रमक
– शेड्युल एक्स, एच व एच 1 औषधे विकणाऱ्यांना आदेश
– औषध विक्रेत्यांनी सीसीटीव्ही लावणे केले अनिवार्य
– दुकानाच्या दर्शनी भागात लावावे लागणार कॅमेरे
– 23 मार्च पासून एका महिन्याची मुदत
– अन्न व औषध प्रशासनामार्फत होणार पडताळणी
– अंमलबजावणी न करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कारवाई
इतर बातम्याः