नाशिककरांना घरपट्टी भरण्यासाठी महापालिकेची सवलत योजना; तब्बल 5 टक्के मिळणार सूट!
नाशिक महापालिकेच्या घरपट्टी योजनेतील सवलतीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना www.nmctax.in किंवा www.nmc.ogv.in या संकेतस्थळावर जावे लागेल. ज्यांचा मोबाइल क्रमांक महापालिकेकडे नोंदवला आहे, त्यांना एसएमएसद्वारे मालमत्ता कराची माहिती कळवण्यात येत आहे.
नाशिकः नाशिककरांसाठी (Nashik) एक आनंदाची बातमी. महापालिकेने (Municipal Corporation) जास्तीत जास्त कर संकलित करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्याचाच भाग म्हणून घरपट्टी अर्थात मालमत्ता कर (Property Tax) भरणाऱ्यांसाठी तब्बल 5 टक्के सूट देण्याची एक सवलत योजना आणण्यात आलीय. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने महापालिकेचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नाचा सर्वात महत्त्वाचा स्त्रोत म्हणजे कर संकलन. आता नवे आयुक्त रमेश पवार यांनी पदभार स्वीकारताच कर संकलन वाढवण्यावर भर दिला आहे. त्यांनी एप्रिल ते मे महिन्यात घरपट्टी भरणाऱ्यांसाठी सवलत योजना जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना आर्थिक वर्ष 2022-2023 ची घरपट्टी आगाऊ म्हणजे या एप्रिल ते जून महिन्यादरम्यान भरावी लागणार आहे. ही मुदत पाळल्यास या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
कशी मिळेल सूट?
महापालिकेच्या घरपट्टी योजनेतील सवलतीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना www.nmctax.in किंवा www.nmc.ogv.in या संकेतस्थळावर जावे लागेल. ज्यांचा मोबाइल क्रमांक महापालिकेकडे नोंदवला गेलेला आहे, त्यांना एसएमएसद्वारे मालमत्ता कराची माहिती कळवण्यात येत आहे. या योजनेनुसार पुढील आर्थिक वर्षाची घरपट्टी एप्रिल महिन्यात भरल्यास पाच टक्के सूट मिळेल. मे महिन्यात भरल्यास तीन टक्के सूट मिळेल, तर जून महिन्यात भरल्यास एक टक्का सूट मिळेल. शिवाय ई-पेमेंट केल्यास अतिरिक्त एक टक्क किंवा एक हजारापर्यंत सूट मिळणार आहे.
पण घोटाळ्याचे काय?
नाशिक महापालिकेच्या घरपट्टीत घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या या विभागाचे संगणकीकरण करण्यात आले आहे. या कामासाठी कर्मचाऱ्यांना पासवर्ड देण्यात आला आहे. त्याचाच गैरवापर काही कर्मचाऱ्यांनी केल्याचे समोर येत आहे. नाशिकरोड, गांधीनगर, चेहेडी केंद्रावर करदात्यांकडून रक्कम जमा करून घेण्यात आली. मात्र, त्यांना दुसऱ्याच पावत्या देण्यात आल्या. शिवाय नागरिकांनी भरलेली रक्कमही पालिकेच्या तिजोरीत जमा करण्यात आली नाही. महापालिकेने मार्च महिन्याचा हिशेब तपासल्यानंतर हा 45 लाखांचा घोटाळा समोर आला आहे.
‘त्या’ नागरिकांचे काय?
नाशिक महापालिकेने घरपट्टी घोटाळ्याप्रकरणी एका महिला लिपिकाला निलंबित केले आहे. मात्र, या घोटाळ्याचा सूत्रधार कोण, त्याच्यावर कधी कारवाई होणार, असा सवाल निर्माण होत आहे. शिवाय ज्यांनी या घोटाळेबाज कर्मचाऱ्यांकडे घरपट्टी भरली, त्यांना पुन्हा घरपट्टी तरी भरावी लागणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याची उत्तरे अजून तरी नागरिकांना मिळालेली नाहीयत.