कापडणीस पिता-पुत्राचा 4 जणांनी केला मर्डर; नाशिकमधील शेअर्स कंपनीच्या मॅनेजरचा सहभाग
कापडणीस हत्याकांडातील मुख्य संशयित राहुल जगतापने गिरणारे शिवारात नानासाहेब कापडणीस यांचा गळा आवळून खून केला. मोखाडा घाटात त्यांच्या चेहऱ्यावर स्पिरीट टाकून तो जाळला. कोणी ओळखू नये म्हणून मृतदेहाच्या अंगावरचे कपडे काढले. हे कपडे पोलिसांच्या हाती लागलेत.
नाशिकः नाशिक (Nashik) येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि त्यांचा डॉक्टर मुलगा अमित कापडणीस यांच्या खुनाची (Murder) अखेर संशयिताने कबुली दिली आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आणि हॉटेल (Hotel) व्यावसायिक राहुल जगतापने चार मित्रांच्या मदतीने कापडणीस पिता-पुत्राला संपवले आहे. विशेष म्हणजे कटात एका शेअर्स ट्रेडिंग कंपनीचा मॅनेजरचा सहभाग आहे. कापडणीस यांचे नाशिकमधल्या पंडित कॉलनीमध्ये 4 प्लॅट, सावरकरनगरमध्ये 2 मोठे बंगले, 97 लाखांचे शेअर्स ट्रेडिंग, 20 लाखांची मुदतपूर्ण ठेव, 30 लाखांची मुदतपूर्ण ठेव, देवळाली कॅम्पमध्ये टोलेजंग रो-हाऊस, नानावलीत 14 लाखांचा गाळा आणि इतरही अफाट संपत्ती आहे. शिवाय कापडणीस पिता-पुत्र दोघेच नाशिकला राहायचे. हे पाहून संपत्तीच्या लोभापोटी हॉटेल व्यावसायिक राहुल जगतापने कापडणीस यांच्या डॉक्टर मुलाशी मैत् करून दोघांचाही काटा काढला.
इथेच संशयित फसला
कापडणीस हत्याकांडातील मुख्य संशयित राहुल जगतापने गिरणारे शिवारात नानासाहेब कापडणीस यांचा गळा आवळून खून केला. मोखाडा घाटात त्यांच्या चेहऱ्यावर स्पिरीट टाकून तो जाळला. कोणी ओळखू नये म्हणून मृतदेहाच्या अंगावरचे कपडे काढले. हे कपडे पोलिसांच्या हाती लागलेत. हा मृतदेह त्याने एका कारमधून नेला. तिची नंबर प्लेट बदलली. ती कार त्याने गो फिश हॉटेलसमोर उभी केली होती. ती ही पोलिसांनी जप्त केलीय. या कारमध्ये रक्ताचे डागही आढळलेत. विशेष म्हणजे कापडणीस यांचे शेअर्स विक्रीचे पैसे स्वतःच्या खात्यात वळवले होते. त्यामुळेच पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी शेअर्स कंपनीच्या मॅनेजरला बेड्या ठोकल्यात.
काय दिली कबुली?
अखेर संशयित राहुल जगतापने कापडणीस हत्याकांडाची कबुली दिलीय. त्याने शेअर्स ट्रेडिंग कंपनीचा मॅनेजर प्रदीप शिरसाठ, सूरज मोरे, विकास हेमके यांच्या मदतीने कापडणीस पिता-पुत्रांचा खून केला. हा खून पचवल्यानंतर तो कापडणीस यांच्या मालमत्तेची विक्री करणार होता. त्यातील काही भाग शिरसाठ, हेमके आणि मोरे यांना देणार होता. मात्र, त्याने कापडणीस यांच्या शेअर्स विक्रीचे पैसे स्वतःच्या खात्यात वळवले. तिथूनच या साऱ्या प्रकरणाला वाचा फुटली आहे.
इतर बातम्याः
युक्रेनमधील भारतीयांसाठी हेल्पलाइन क्रमांक घोषित; एका फोनवर मिळेल मदत, जाणून घ्या सर्व नंबर!
युक्रेनमध्ये अडकलेल्यांसाठी नाशिक जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाइन सुरू; कुठे मिळेल मदत?