राज्यात शेतकरी आत्महत्या होतायेत, पण कृषीमंत्री सध्या…; संभाजीराजे धनंजय मुंडेंवर बरसले
Sambhajiraje Chhatrapati on Dhananjay Munde : शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावरून छत्रपती संभाजीराजे यांचा धनंजय मुंडेंवर घणाघात; म्हणाले... राज्यात शेतकरी आत्महत्या होतायेत, पण कृषीमंत्री सध्या... पाहा नेमकं काय म्हणाले
नाशिक | 11 सप्टेंबर 2023 : स्वराज्य संघटनेचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी शेतकरी आत्महत्येबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. बीड जिल्ह्यात आणि राज्यातच शेतकरी आत्महत्या होत आहेत. कृषी धोरण ब्रिटिशांनी केलेलं आहे, त्यात बदल झालेला नाही. लाँग टर्म पॉलिसी यायला हवी. कृषी मंत्री सध्या उत्तर सभा घेण्यात बिझी आहे. जे काही राजकारणात चालू आहे, त्यात लोकांना इंटरेस्ट नाही. लोकांची कामं होणं गरजेचं आहे. शेतकरी आत्महत्या रोखणं सध्याचं आव्हान आहे, असं संभाजीराजे म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आता आणखी तीव्र झालं आहे. त्यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस आहे. जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. त्यावर संभाजीराजेंनी प्रतिक्रिया दिली आहे. आज सर्वपक्षीय बैठक आहे. कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गिरीश महाजन यांचा फोन आला होता. मराठा समाजासाठी या बैठकीला मी उपस्थित राहील. सरकारने सर्व पक्षीय नेत्यांना बोलवलं, याचं कौतुक आहे. भावना आणि न्यायिक भूमिका यांचा समन्वय साधला जाईल, अशी अपेक्षा आहे, असं ते म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मराठा समाज आहे. इतके दिवस गरीब मराठा समाजाला बाहेर का ठेवलं? मी संसद आवारात जाऊन आंदोलन केलं. राणे समितीने आरक्षण दिलं, पण ते टिकलं नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात देखील आरक्षण टिकलं नाही. या सरकारने दीड वर्षात भूमिका घेतली नाही, हे दुर्दैवी आहे. मी मागच्या सरकारला आणि या सरकारला देखील जाब विचारणार आहे, असंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे न घेण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला सरकरट कुणबी प्रमाण पत्र देण्यात यावं, असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने तीन वेळा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मात्र मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहेत. मागण्या मान्य होत नाहीत. तोवर मागे हटणार नाही, असा निर्धार त्यांनी केला आहे. त्यामुळे आज सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे.