सर्वात मोठी बातमी! नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडून ठाकरे गटाला मोठं खिंडार, भाऊसाहेब चौधरी यांचा रात्री बारा वाजता पक्षप्रवेश
"माझ्या पक्षप्रवेशाने आरोप-प्रत्यारोप होत राहतील. पण मी माझ्या कामाने प्रत्यारोप देईन", असं भाऊसाहेब चौधरी यांनी पक्षप्रवेश करताना म्हटलं.
नागपूर : नागपूरमधून एक खूप मोठी बातमी समोर आलीय. नाशिकमधील ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागपुरातील ‘रामगिरी’ या शासकीय निवासस्थानी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. “माझ्या पक्षप्रवेशाने आरोप-प्रत्यारोप होत राहतील. पण मी माझ्या कामाने प्रत्यारोप देईन”, असं भाऊसाहेब चौधरी यांनी पक्षप्रवेश करताना म्हटलं.
“मी जवळपास 30 ते 32 वर्षांपासून शिवसेनेचं काम करतोय. डोंबिवली असेल किंवा ठाणं असेल, मी सगळीकडे प्रामाणिकपणे काम केलंय. मला जी काही जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचं काम मी केलं”, असं भाऊसाहेब चौधरी म्हणाले.
“गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आम्ही नाशिककरांच्या अनेक व्यथा घेऊन गेलो होते. तत्कालीन मुख्यमंत्र्यांना निवेदनं दिली, काही कामं सांगितली, पण एकनाथल शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून काम करायला घेतलं तेव्हापासून त्यांनी नाशिककरांचं कामं सोडवण्याचे प्रयत्न केले”, असं चौधरी म्हणाले.
“इथून पुढे मी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक ठिकाणी माझी जबाबदारी पाडण्याचं काम करणार आहे”, असं भाऊसाहेब चौधरी यांनी जाहीर केलं.
नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुखाचाही राजीनामा
दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आलीय. खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवर काही तासांपूर्वी महत्त्वाची माहिती दिली होती.
ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांची ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टी केल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली होती. त्यानंतर भाऊसाहेब चौधरी यांच्या समर्थनार्थ सुनील पाटील यांनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिलाय.
सुनील पाटील यांनी फेसबुक पोस्ट टाकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलाय. “आमचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या समर्थनार्थ माझ्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देतोय”, असं सुनील पाटील फेसबुकवर म्हणाले आहेत.
माझा शिवसेना उद्धव गटाचा राजीनामा. मी सुनील पाटील, शिवसेना (उद्धव गट) नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख आमचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या समर्थनार्थ माझ्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देतोय, असं सुनील पाटील यांनी म्हटलंय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आगे बढो. हम नाशिककर आप के साथ है, असं देखील सुनील पाटील म्हणाले आहेत.