मालेगावमध्ये आता पोलिओ लसीकरणाकडेही पाठ; 3500 डोस पडून, प्रकरण काय?
कोरोना लसीकरणानंतर मालेगाव पूर्वमधील नागरिकांनी पोलिओ लसीकरण मोहिमेकडे पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. या भागात बहुतांश लोकवस्ती मुस्लिम धर्मियांची आहे. त्यांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्यामुळे प्रशासन चिंतेत आहे. या भागात पुन्हा एकदा पोलिओ रुग्ण आढळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मालेगावः धर्म, पंथ, जात आणि पातीच्या भिंती अनेकदा इतक्या बुलंद होतात की त्याच्यापुढे काही केले तरी विज्ञानही थिटे पडते. डोळ्यावर पिवळ्या रंगाचा चष्मा लागलेला असतो. त्यामुळे सारे जग अशा व्यक्तीला पिवळ्या रंगात न्हाऊन निघाल्याचे वाटते. नेमके तसेच नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या मालेगावमध्ये (Malegaon Polio) होताना दिसते आहे. येथे कोरोनाच्या प्रतिबंधक लसीकरणाकडे शहरातील पूर्व भागातील नागरिकांनी पाठ फिरवल्याचे समोर आले होते. आता पुन्हा एकदा त्याच मालेगाव पूर्वमधील नागरिकांनी पोलिओ (Polio) लसीकरणाकडेही पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एक-दोन नव्हे, तर चक्क 3500 डोस पडून आहेत. या आठमुठ्या भूमिकेमुळे प्रशासन हैराण झाले आहे. आजवर राजकारणामुळे चर्चेत राहणारे हे शहर आता या नव्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. पोलिओ लसीकरण मोहीम अपयशी ठरल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. यासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृतीचे काम हाती घेणार असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली.
असा बसला फटका
मालेगाव शहरात कोरोनाच्या साथीने थैमान घातले होते. पूर्व भागात नागरिकांनी नियम न पाळल्यामुळे अनेकांचा कोरोना काळात मृत्यू देखील झाला. कोरोना संसर्ग आजारावर कोविड लसीकरण हा आतापर्यंत रामबाण उपाय ठरला आहे. मात्र, या लसीकरण मोहिमेला देखील मालेगावच्या पूर्व भागात नागरिकांनी असमर्थता दर्शविली आहे. मालेगाव शहरात लसीकरणाची टक्केवारी अत्यल्प असल्यामुळे नाशिक जिल्हा खूप उशिरा निर्बंधमुक्त करण्यात आला.
धर्मगुरूंची घेणार मदत
कोरोना लसीकरणानंतर मालेगाव पूर्वमधील नागरिकांनी पोलिओ लसीकरण मोहिमेकडे पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. या भागात बहुतांश लोकवस्ती मुस्लिम धर्मियांची आहे. त्यांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्यामुळे प्रशासन चिंतेत आहे. या भागात पुन्हा एकदा पोलिओ रुग्ण आढळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिकेने जनजागृतीसाठी धर्मगुरूंची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या आवाहनाला तर नागरिक प्रतिसाद देतील का, हे पाहावे लागेल.
इतर बातम्याः