राज ठाकरे मनसेच्या झेंड्याचा रंग सारखा बदलतात, त्यांच्यापासून… रामदास आठवले यांनी लगावली कोपरखळी
मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. पण त्याला ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. त्यावर तोडगा काढला पाहिजे. मराठा समाज हा सुशिक्षित आणि प्रगतीशील आहे. मराठा समाजातील लोक राजकारणातही आहेत. पण गरीब मराठ्यांना आरक्षण देणं गरजेचं आहे, असं सांगतानाच तामिळनाडूच्या धर्तीवर 69 टक्के आरक्षण दिलं पाहिजे, असं रामदास आठवले म्हणाले.
जितेंद्र बैसाणे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नंदूरबार | 2 जानेवारी 2024 : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना महायुतीत घेण्यास पुन्हा एकदा विरोध केला आहे. यावेळी मात्र, राज ठाकरे यांना न घेण्यामागचं मजेशीर कारणही आठवले यांनी दिलं आहे. राज ठाकरे सारखा मनसेच्या झेंड्याचा रंग बदलत असतात. त्यामुळे राज हे महायुतीपासून लांबच बरे, असं सांगतानाच राज ठाकरे महायुतीत आल्यास महायुतीचं नुकसानच होईल. सर्वाधिक फटका हा भाजपला बसेल, असा दावाही रामदास आठवले यांनी केला.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे नंदूरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. रिपाइंच्या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करण्यासाठी ते आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. राज यांच्याशी माझं कुठलंही वैयक्तिक वैर नाही. परंतु, त्यांची भूमिका चुकीची आहे. आधी ते सर्व समाजाला घेऊन जात होते. मात्र आता त्यांनी मुस्लिम समाजाला दूर केलं आहे. त्यामुळे मला त्यांची भूमिका पटत नाही, असं सांगतानाच राज ठाकरे हे हिंदुत्वाच्या बाजूने असल्याचंही रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं.
बारा वाजवणारच
महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांचा प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्यास विरोध आहे. असं असलं तरी प्रकाश आंबेडकरांना दूर ठेवून महाविकास आघाडीला चालणार नाही. आघाडीला आंबेडकरांचा 12-12-12-12 चा फॉर्म्युला स्वीकारावा लागणार आहे. पण हा फॉर्म्युला स्वीकारल्यानंतरही आम्ही चारही पक्षाचे बारा वाजवणार आहोत, असा टोला आठवले यांनी लगावला आहे.
इतरांनाही निमंत्रण मिळेल
राम मंदिराच्या उद्घाटनावरून केंद्र सरकारवर आरोप करण्यात येत आहेत. निवडणुका समोर ठेवून भाजप राम मंदिराचे उद्घाटन करत आहे, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. राऊत यांच्या या आरोपालाही आठवले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राम मंदिराचे उद्घाटन करण्यात येत नाहीये. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर राम मंदिर तयार होत आहे आणि संविधानानुसारच राम मंदिराचे उद्घाटन होत आहे. मात्र संजय राऊत सारखे लोक चुकीच्या बातम्या पसरवत आहेत. राम मंदिरच्या उद्घाटनासाठी अनेकांना निमंत्रण दिलं आहे आणि काही बाकी राहिले आहेत. त्यांना देखील निमंत्रण देण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.