बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत पार्टीचा आरोप, सुधाकर बडगूजर यांनी पोलिसांच्या चौकशीत काय जबाब दिला?
ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांची आज दीड तास पोलीस चौकशी झाली. यावेळी बडगुजर यांना पोलिसांकडून काही महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आले. बडगुजर यांनी यावेळी पोलिसांना कसं सहकार्य केलं, याबाबत पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली.
नाशिक | 19 डिसेंबर 2023 : भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत ठाकरे गटाचे नाशिकचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांचे फोटो दाखवत गंभीर आरोप केले. त्यांनी सुधाकर बडगुजर यांचे एका पार्टीत नाचतानाचे फोटो दाखवले. विशेष म्हणजे बडगुजर यांच्यासोबत या फोटोंमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा उजवा हात समजला जाणारा सलीम कुत्ता हा देखील दिसला. नितेश राणे यांनी नंतर सुधाकर बडगुजर आणि सलीम कुत्ता यांच्या एकत्र डान्सचा व्हिडीओही जारी केला. सुधाकर बडगुजर यांनी 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपी असलेल्या सलीम कुत्तासोबत पार्टी केल्याचा आरोप नितेश राणेंनी केलाय. बडगूजर यांच्यावरील या आरोपांची दखल नाशिक पोलिसांनी घेतली आहे. नाशिक पोलिसांकडून सुधाकर बडगुजर यांची चौकशी केली जात आहे. नाशिक पोलिसांनी आज देखील बडगुजर यांची सलग दीड तास चौकशी केली. या चौकशीत काय-काय घडलं याबाबतची माहिती समोर आली.
शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखा उपायुक्त प्रशांत बच्छाव, गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी सुधाकर बडगुजर यांची आज चौकशी केली. सुधाकर बडगुजर यांची दीड तास चौकशी झाली. पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी सुधाकर बडगुजर आता कायदेशीर मदत घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बडगुजर यांच्यावर आरोप झाल्यानंतर लगेच पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. त्यावेळी बडगुजर मुंबईला निघाले होते. पण ते चौकशीसाठी नाशिक पोलीस ठाण्यात दाखल झाले. यानंतर बडगुजर यांना सातत्याने चौकशीच्या ससेमिराला जावं लागतंय.
सुधाकर बडगुजर यांची प्रतिक्रिया काय?
सुधाकर बडगुजर यांच्या दीड तासांच्या चौकशीनंतर ते पोलीस ठाण्याच्या बाहेर पडले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. पोलिसांची सध्या चौकशी सुरू आहे. वकिलांची कायदेशीर मदत घेऊन काही प्रश्नांची उत्तरे देईन, अशी प्रतिक्रिया सुधाकर बडगुजर यांनी दिली.
पोलिसांची प्रतिक्रिया काय?
गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनीदेखील सुधाकर बडगुजर यांच्या चौकशीनंतर प्रतिक्रिया दिली. “त्यांनी त्रोटक स्वरूपात उत्तरे दिली. काही प्रश्नांसाठी कायदेशीर मदत घ्यायची, असं सांगितलं आहे. त्यासाठी वेळ मागितला आहे. आतापर्यंत व्हिडीओशी संबंधित 13 ते 14 जणांची चौकशी झाली. हा व्हिडिओ २०१६ सालचा आहे. कागदपत्रे समोर आल्यानंतर फार्म हाऊस कुणाचा आहे, हे समोर येईल. सलीम कुत्ता हा शिक्षाबंदी आरोपी आहे, त्यासाठी प्रक्रिया आहे. आम्हाला आवश्यक वाटल्यावर आम्ही जबाब घेऊ. सुधाकर बडगुजर यांच्याकडून चौकशीला सहकार्य आहे. ही चौकशी चालू राहणार”, अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षकांनी दिली.