देवदर्शनावरून परतणाऱ्या महिलेचा महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या धक्क्याने मृत्यू; नाशिकमधल्या घटनेने हळहळ
देवदर्शन करून परतणाऱ्या महिलेचा महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावमध्ये घडली आहे. स्वाती शिंदे असे त्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी नांदगावकरांनी रेल्वे प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
नाशिकः देवदर्शन करून परतणाऱ्या महिलेचा महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावमध्ये घडली आहे. स्वाती शिंदे असे त्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी नांदगावकरांनी रेल्वे प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
सध्या नाशिक शहरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे. सरकारच्या आदेशानुसार मंदिरेही खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे सकाळपासून नागरिक मंदिरात दर्शनासाठी गर्दी करत आहेत. काही मंदिरांनी ऑनलाइन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, देवाच्या पायावर माथा टेकवल्याशिवाय अनेकांचा दिनक्रम सुरू होत नाही. नांदगावातल्या नवीन वस्ती येथल्या रहिवासी स्वाती शिंदे या सुद्धा आज सकाळी ग्रामदैवत एकवीस देवीच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. देवदर्शन परतून येताना त्यांना रेल्वे रूळ ओलांडावा लागला. कारण भूयारी मार्गात पाणी साचले होते. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस हजेरी लावतोय. त्यामुळे त्या पाण्यातून वाट काढत बाहेर येणे त्यांना धोकादायक वाटले. त्यामुळे स्वाती शिंदे यांनी घरी जाण्यासाठी भूयारी मार्गाऐवजी रेल्वे रूळ ओलांडायचा निर्णय घेतला. मात्र, त्यांना रेल्वेचा अंदाज आला नाही. रूळ ओलांडताना त्यांना महाराष्ट्र एक्स्प्रेसने धक्का दिला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी नांदगावकरांनी रेल्वे प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मोर्चा काढला.
नाशिकमध्येही अनेक घटना
नाशिकमध्ये यापूर्वी रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेचा धक्का लागून मृत्यू होण्याचे प्रकार घडले आहेत. अनेक तरुण हेडफोन घालून रेल्वे रुळ ओलांडायचा प्रयत्न करतात. हेडफोनच्या नादात त्यांचे रेल्वेच्या आवाजाकडे दुर्लक्ष होते. यात त्यांचा मृत्यू होतो. अशीच घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. देवळाली कॅम्प आणि नाशिकरोड येथे रेल्वे रूळ ओलांडताना तरुणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे शक्यतो भूयारी मार्गाचा वापर करावा. रेल्वे रूळ ओलांडायचा धोका पत्करू नये, ते जीवावर बेतू शकते, असे आवाहन नाशिक पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
ऑनलाइन दर्शन घ्यावे
नाशिकमध्ये अनेक जण पुन्हा एकदा मंदिरात दर्शनासाठी गर्दी करत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. हे पाहता नागरिकांनी गर्दी करू नये. ज्या ठिकाणी शक्य असेल तिथे ऑनलाइन दर्शन घ्यावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. सध्या निफाड, येवला आणि सिन्नर तालुक्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत. पांगरी येथील शाळा कोरोना रुग्ण वाढल्यामुळे बंद करावी लागली आहे. हे पाहता नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
इतर बातम्याः
आणखी एक ‘भाविक’ हरपला; नाशिकचे प्रख्यात तबलावादक पंडित विजय हिंगणे यांचे निधन
वीज पडून महिला ठार; नाशिक जिल्ह्यातल्या शिरवाडे वणी येथील घटना
Chipi Airport : ‘मुंबई’च्या उद्धव ठाकरेंचे ‘सिंधुदुर्ग’च्या नारायण राणेंना खास ‘पुणे’री टोमणे!https://t.co/BXrr2vFuAy#chipiairport #UddhavThackeray #NarayanRane
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 10, 2021