Nashik|निवडणुकीच्या तोंडावर ‘राष्ट्रवादी’चे परिवार संवाद; जिजाऊ जयंतीदिनी फोडला नारळ, काय आहे अभियान?
नाशिकमधील पंचवटी येथे विभागीय अध्यक्ष शंकर मोकळ यांच्या संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी परिवार संवाद अभियानाचा नारळ फुटला.
नाशिकः नाशिकमध्ये राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वतीने बुधवारी राष्ट्रवादी परिवार संवाद अभियान सुरू करण्यात आले. राजमाता जिजाऊ (Rajmata Jijau) यांना अभिवादन करून या अभियानाचा नारळ फोडण्यात आला. या अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व पक्षाची धेय्य धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब कर्डक यांनी केले. पंचवटी येथे विभागीय अध्यक्ष शंकर मोकळ यांच्या संपर्क कार्यालयात या अभियानाचा नारळ फुटला.
स्वराज्य संकल्पनेतून…
बाळासाहेब कर्डक म्हणाले की, नाशिक महानगरपालिका पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आढावा घेत निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. आगामी महानगरपालिका निवडणूक मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रणशिंग फुंकले असून, आज राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्ताने पंचवटी विभागात राष्ट्रवादी परिवार संवाद अभियानास सुरुवात करण्यात येत आहे. राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्याची संकल्पना मांडली तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी ती संकल्पना पूर्ण केली. ही संकल्पना घेऊन महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्याचा संकल्प राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने केला असल्याचे कर्डक यांनी यावेळी सांगितले.
महानगरातील समस्या जाणून घेणार…
कर्डक म्हणाले की, राष्ट्रवादी संवाद अभियानाच्या माध्यमातून पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी, इच्छुक उमेदवार, समाजसेवक यांच्या भेटीगाठी घेऊन पक्षाचे अध्यक्ष पवार साहेब व पक्षाचे विचार, धेय्य धोरणे याबाबत संवाद घडवून आणण्यात येईल. तसेच नाशिक महानगरातील समस्या जाणून घेऊन आगामी महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे सांगत राष्ट्रवादी संवाद अभियान राबवीत असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व उपाययोजना करून नियमांचे पालन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, विभागीय अध्यक्ष शंकर मोकळ, महापलिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, विद्यार्थी शहराध्यक्ष गौरव गोवर्धने, रवी हिरवे, सचिन कळासरे, संतोष जगताप, प्रफुल्ल पाटील, भालचंद्र भुजबळ, दर्शन मंडलिक, गणेश पेलमहाले, आकाश कोकाटे, विलास वाघ, आर्यन मोकळ, साहिल मोकळ, भूषण सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी संवाद अभियानाच्या माध्यमातून पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी, इच्छुक उमेदवार, समाजसेवक यांच्या भेटीगाठी घेऊन पक्षाचे अध्यक्ष पवार साहेब व पक्षाचे विचार, धेय्य धोरणे याबाबत संवाद घडवून आणण्यात येईल. – बाळासाहेब कर्डक, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस
इतर बातम्याः
Nashik Oxygen|राज्यातला सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट नाशिकमध्ये; उत्तर महाराष्ट्राचीही चिंता मिटली