Nashik|मालेगाव MIDC ची जलद उभारणी; वस्त्रोद्योग पार्क, अजंग प्रकल्पाच्या भूखंड वाटप दरास मुदतवाढ
उद्योग मंत्री देसाई म्हणाले की, मालेगाव एमआयडीसी अंतर्गत अजंग गाव ते औद्योगिक वसाहत पोहोच रस्त्यांच्या कामासंदर्भातील कार्यवाही एका महिन्यात पूर्ण करावी. तसेच अभिन्यांसातील अंतर्गत रस्ते तयार करण्यात यावेत.
नाशिकः एक सर्व नाशिककरांसाठी आणि त्यातही विशेषतः मालेगाव तालुक्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी. मालेगाव ही जलदगतीने उभारण्यात आलेली विशेष एमआयडीसी (MIDC) असून, याअंतर्गत असलेली प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, असे आदेश उद्योग मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी दिले आहेत. सोबतच येथील उद्योग प्रकल्प तातडीने सुरू करण्याबाबत सर्वतोपरी सहकार्य करू. उद्योग नियमावली प्रमाणे वस्त्रोद्योग पार्क व अजंग प्रकल्पांसाठी भूखंड वाटपाच्या दरास मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, असे आदेशही सुभाष देसाई यांनी दिले आहेत. त्यामुळे मालेगावकरांना विशेष दिलासा मिळाला आहे.
प्रलंबित कामांवर चर्चा…
उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि कृषिमंत्री दादा भुसे यांच्यात मंत्रालयात नाशिक, मालेगाव येथील अजंग-रावळगाव औद्योगिक वसाहत टप्पा क्रमांक 3 येथील प्रलंबित कामाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन, सहसचिव संजय देगावकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय काटकर, अवर सचिव किरण जाधव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. बैठकीत एमआयडीसीअंतर्गत असलेल्या समस्या कृषिमंत्री दादा भुसे यांनी यावेळी मांडल्या. त्यांनी मालेगाव येथील उद्योजकांसाठी केलेल्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती यावेळी दिली.
मार्चनंतर दर वाढणार…
बैठकीत उद्योग मंत्री देसाई म्हणाले की, मालेगाव एमआयडीसी अंतर्गत अजंग गाव ते औद्योगिक वसाहत पोहोच रस्त्यांच्या कामासंदर्भातील कार्यवाही एका महिन्यात पूर्ण करावी. तसेच अभिन्यांसातील अंतर्गत रस्ते तयार करण्यात यावेत. वस्त्रोदद्योग पार्क व अजंग टप्पा क्रमांक तीन भूखंड वाटपाच्या 600 रुपये प्रति चौरस मीटर या दरास मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी. यानंतर 790 प्रमाणे दर करण्यात यावेत, असे आदेशही त्यांनी दिले.
पाणी, वीजेची सोय…
जे प्रकल्प काम सुरू करत आहेत, त्यांना तात्पुरत्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी पाणीपुरवठा योजना क्रमांक दोनसाठी तांत्रिक मंजुरी तसेच निविदा प्रक्रियेची प्रक्रिया करण्यात यावी. वीजेसंदर्भातही सध्या तात्पुरत्या स्वरूपात वीज व्यवस्था करावी. त्यासाठी ऊर्जा विभागासोबत पाठपुरावा करून वीजेसाठी उपस्टेशन कार्यान्वीत करावेत. प्लास्टिक, वस्त्रोद्योग, फूड व इतर उद्योगांसाठी सुधारित अभिन्यास मान्यता देण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देशही यावेळी उद्योग मंत्री देसाई यांनी दिले आहेत.
इतर बातम्याः
Nashik Oxygen|राज्यातला सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट नाशिकमध्ये; उत्तर महाराष्ट्राचीही चिंता मिटली