नाशिकचे संमेलन फक्त भुजबळांचे, पंचतारांकितच्या भपक्यात धोरणाचा बळी; ठाले-पाटलांचे ताशेरे
कौतिकराव ठाले-पाटील म्हणाले की, नाशिकने संमेलनासाठी निधी उभारण्याचा नवा फॉर्म्युलाच शोधला आहे. एखाद्या मंत्र्याला किंवा वजनदार नेत्याला स्वागताध्यक्षपद बहाल केले की, साहित्य संमेलन कम राजकीय संमेलन झोकात साजरे झालेच म्हणून समजा. भागातील दहा-वीस आमदार आणि एक दोन खासदारांची पत्रे घ्यायची. त्यांच्या निधीतून दीड-दोन कोटी विनासायास मिळतात.
नाशिकः नाशिक (Nashik) येथे डिसेंबर महिन्यात झालेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा (Sahitya Sammelan) वाद उदगीर येथे होणारे 95 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन जवळ आले तरी शमता शमत नाही. आता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी एक लेख लिहून संमेलन निमंत्रकापासून ते आयोजकांपर्यंत साऱ्यांवर ताशेरे ओढले आहेत. नाशिकचे साहित्य संमेलन एकट्या छगन भुजबळांचे (Chhagan Bhujbal) झाले. साहित्य संमेलन पंचतारांकित करण्याच्या नादात महामंडळाच्या धोरणाचा बळी दिला, असा आरोप ठाले-पाटील यांनी केला आहे. त्यांनी महामंडळाच्या अक्षरयात्रा या नियतकालिकातील अध्यक्षीय मनोगतातून ही खरडपट्टी काढली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संमेलनाची जोरदार चर्चा सुरू आहे.
निमंत्रकांनी केली फसवणूक
ठाले – पाटील लेखात म्हणतात की, उस्मानाबादमध्येच आम्ही पुढचे संमेलन नाशिकला घेऊ असा शब्द दिला. मात्र, संमेलन उस्मानाबादसारखे साधे आणि लोकांचे व्हावे, अशी अट घातली. नाशिकच्या संमेलनकर्त्यांनी तसा शब्द दिला. मात्र, ते शब्दांना जागणारे निघाले नाहीत. त्यांच्यातले काही पक्के व्यावसायिक, हिशेबी, भपक्याच्या मोहात पडले. त्यांनी लोकांना दूर लोटले. पंचतारांकित साहित्य संमेलनाच्या नादात साहित्य महामंडळाचा हेतू आणि धोरणाचा बळी दिला. स्वागताध्यक्षापुरती फक्त एका नेत्याची परवानगी द्या. दुसऱ्या कोणत्याही नेत्याला व्यासपीठाचा वापर करू देणार नाही, असे आश्वासन लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी दिले. मात्र, त्यांनी आमची फसवणूक केली. हे समजले तेव्हा उशीरा झाला होता, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
निधी संमेलनाचा नवा फॉर्म्युला
ठाले-पाटील आपल्या लेखात म्हणतात की, नाशिकने संमेलनासाठी निधी उभारण्याचा नवा फॉर्म्युलाच शोधला आहे. एखाद्या मंत्र्याला किंवा वजनदार नेत्याला स्वागताध्यक्षपद बहाल केले की, साहित्य संमेलन कम राजकीय संमेलन झोकात साजरे झालेच म्हणून समजा. भागातील दहा-वीस आमदार आणि एक दोन खासदारांची पत्रे घ्यायची. त्यांच्या निधीतून दीड-दोन कोटी विनासायास मिळतात. ते पैसे सरकारी तिजोरीतून, सरकारच्या परवानगीने संमेलनाच्या खात्यात जमा होता. मात्र, भविष्यात साहित्य संमेलन लोकांचे होण्याऐवजी सरकारचे होईल. हा साहित्य संस्था आणि वाडमयीन जगताला मोठा धोका असल्याची भीती त्यांनी व्यक्त केलीय.
नारळीकरांनी कोंडी केली
ठाले-पाटील लेखात म्हणतात की, साहित्य संमेलन शहराबाहेर 20 किलोमीटर अंतरावर झाले. त्यामुळे नाशिककर तिकडे फिरकलेच नाहीत. रसिकांसाठी जायची-यायची सोय होती. मात्र, हे संमेलन एकटे भुजबळांचे झाले, अशी टीका त्यांनी केलीय. शिवाय संमलेनाध्यक्ष जयंत नारळीकर गैरहजर राहिले. त्यांनी याबाबत मला व्यक्तीशः कळवले नाही. साहित्य महामंडळ आणि स्वागत मंडळाची कोंडी करण्यात त्यांनी कोणतीच कसर सोडली नाही, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली आहे.
इतर बातम्याः
चर्चा तर होणारच: केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या दौऱ्याचे नाशिकमध्ये ‘कुर्रर्रर’ राजकीय नाट्य…!
कापडणीस पिता-पुत्राचा 4 जणांनी केला मर्डर; नाशिकमधील शेअर्स कंपनीच्या मॅनेजरचा सहभाग