अजित पवारांविरोधात भुजबळ यांनी रणशिंग फुंकले, राज्यव्यापी दौरा करणार
गावागावातून, जिल्ह्यातून फोन येत आहे. भुजबळ साहेब या. ताकद वाढवा. होय खरं आहे. मी संपूर्ण राज्यात जाणार आहे. मी अनेक राज्यातून जाणार आणि ओबीसींचा एल्गार पुकारणार आहे. ही आपली लढाई आहे. परत आवाज द्यायला सुरुवात झाली आहे. पण ही लढाई आमदार म्हणून सभागृहामध्ये लढणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने माजी मंत्री छगन भुजबळ यांनी रणशिंग फुंकले आहे. मंत्रिपदाच्या विस्तारानंतर अस्वस्थ असलेल्या छगन भुजबळ यांनी बुधवारी मोठा निर्णय जाहीर केला. छगन भुजबळ म्हणाले, गावागावातून, जिल्ह्यातून फोन येत आहे. भुजबळ साहेब या. ताकद वाढवा. होय खरे आहे. मी संपूर्ण राज्यात जाणार आहे. मी अनेक राज्यातून जाणार आणि ओबीसींचा एल्गार पुकारणार आहे, असे भुजबळ यांनी म्हटले. नाशिकमध्ये समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक पार पडली. त्या बैठकीत छगन भुजबळ यांनी हा निर्णय जाहीर केला.
आता थेट अजित पवार यांना इशारा
छगन भुजबळ म्हणाले की, आपल्याला व्होकल मंत्री हवे, व्होकल नेते पाहिजे. जे आमच्यासाठी बोलतील. ही आपली लढाई आहे. परत आवाज द्यायला सुरुवात झाली आहे. पण ही लढाई आमदार म्हणून सभागृहामध्ये लढणार आहे. तिथे कितीही बंधने असली तरी रास्ता तो मेरा है, असा थेट इशारा छगन भुजबळ यांनी अजित पवार यांना त्यांचे नाव न घेता दिला.
लोकसभेत काय झाले?
छगन भुजबळ यांनी लोकसभेपासून राष्ट्रवादी सुरु असलेले राजकारण सांगितले. भुजबळ म्हणाले, लोकसभेत मला नाशिक मतदार संघातून उभे करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी घेतला होता. त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी ते समजवणारही होते. परंतु तो निर्णय झाला नाही. त्यामुळे मी स्वत:हून माघार घेतली. त्यानंतर राज्यसभेत मला पाठवणार असल्याचे सांगितले. परंतु लोकसभा निवडणुकीत सुनेत्राताई यांचा पराभव झाल्यामुळे राज्यसभेत त्यांना पाठवण्याचा निर्णय झाला. त्यावेळी मी शांत राहिला. त्यानंतर साताऱ्याची जागा भाजपला हवी होती. त्यासाठी एक राज्यसभेची जागा ते राष्ट्रवादीला देणार होते.
साताऱ्यासाठी नितीन पाटील इच्छुक होते. अजित पवार यांनी नितीन पाटील यांना सांगितले तुम्ही माघार घ्या. मी तुम्हाला खासदार करेन. परत नितीन पाटील यांचे नाव आले. खासदारकीची पोस्ट देताना चर्चा केली होती. मलाही शब्द दिला होता ना. जो न्याय त्याला दिला मला का नाही दिला? असा सवाल भुजबळ यांनी विचारला.
भुजबळ पुढे म्हणाले, मला विधानसभेचे तिकीट दिले. मी विपरीत परिस्थितीत विजयी झालो. आता मला म्हणतात, राज्यसभेत पाठवणार? पण विधानसभेत ज्यांनी जिवाचे रान करून मला निवडून आणले ते डोकी फोडून घेतील ना. त्यांना मी काय सांगणार? मतदारांना काय सांगणार? यामुळे मी म्हटले मी माझ्या लोकांना मी आता सोडू शकत नाही.