Mumbai Goa Highway : स्फोटाचा प्रचंड आवाज… अचानक पूल हलला, रत्नागिरीत उड्डाण पुलाचा गर्डर तुटला; सुदैवाने…
चिपळूण येथे मोठी दुर्घटना होता होता थांबली आहे. शेख बहादूर नाका येथील उड्डाण पुलाचा गर्डर तुटला आहे. सहा महिन्यातील ही दुसरी घटना असल्याने स्थानिक नागरिक चांगलेच भयभीत झाले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी होत आहे.

कृष्णकांत साळगावकर, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, रत्नागिरी | 16 ऑक्टोबर 2023 : चिपळूणमध्ये एक मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर उड्डाण पुलाचं काम सुरू असताना या उड्डाण पुलाचा गर्डर अचानक तुटला. सुदैवाने या परिसरात कोणी नसल्याने कोणतीही जीवीत हानी झाली नाही. मात्र, या दुर्घटनेमुळे स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत. याच उड्डाण पुलावर गर्डर तुटण्याची ही दुसऱ्यांदा घटना घडली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. पूल पूर्ण होण्याआधीच दुर्घटना होत असेल तर झाल्यानंतर काय होईल?, असा सवाल स्थानिक करत आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावर बहादूर शेख नाका येथे हा उड्डाण पूल आहे. या उड्डाण पुलाचा गर्डर आज सकाळी तुटला. आधी स्फोटासारखा मोठा आवाज आला. त्यामुळे स्थानिक लोक घराबाहेर आले. त्यावेळी त्यांना पूल हलताना दिसला. त्यामुळे हे लोक अधिकच भयभीत झाले. सुदैवाने पुलामध्ये सळ्या असल्याने पूल कोसळला नाही. किंवा खाली आला नाही. मात्र, दुसऱ्यांदा ही घटना घडल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. या प्रकरणाची प्रशासनाकडे वारंवार तक्रार करण्यात आली होती. पण त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी यावं, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
ठाकरे गटाकडून मारहाण
दरम्यान, पुलाचा गर्डर कोसळल्याची माहिती मिळताच ठाकरे गटासह सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पुलाजवळ एकही अधिकारी आलेला नव्हता. त्यानंतर सेफ्टी इंजिनीयर या ठिकाणी आला. तेव्हा त्याला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ करत जाब विचारला. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी या इंजीनियरला मारहाणही केली. त्यामुळे या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या उड्डाणपूलाचे काम निकृष्ट करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. तसेच या कामाच्या चौकशीची मागणीही करण्यात आली आहे.
दुसऱ्यांदा दुर्घटना
यापूर्वी ऑगस्टमध्ये रत्नागिरीतील हा मुंबई-गोवा महामार्गावरील याच उड्डाण पुलाचा गर्डर लॉन्चर तुटला होता. महाकाय लॉन्चरचे काही भाग तुटल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीस मोठा धोका निर्माण झाला होता. यावेळी कोणतीही जीवीतहानी झाली नव्हती. मात्र, जास्तीच्या वजनामुळे गर्डर लॉन्चर खाली कोसळण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यावेळी या गर्डरचा कोणताही धोका नसल्याचा आणि पुलालाही कोणताच धोका नसल्याचं सांगितलं गेलं होतं. त्यानंतरही ही दुर्घटना घडली आहे.