Jitendra Awhad : जो माणूस बाळासाहेब ठाकरे, शरद पवारांचा झाला नाही, तो नवी मुंबईकरांचा काय होणार? आव्हाडांचा गणेश नाईकांवर हल्लाबोल
आमच्या साहेबांनी त्यांच्यावर अंत्यत विश्वासाने नवी मुंबई सोपवली होती. पण त्याने नवी मुंबईचे रक्त शोषले. त्यांनी सर्व नवी मुंबईकरांची माफी मागावी, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
नवी मुंबई : वृक्षतोडीबद्दलचा ठराव आमच्या आधीचा आहे. नवी मुंबई स्वत:ची सलतनत मानणाऱ्या गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी हा ठराव पास करून घेतला, आता का ओरडत आहात, असा सवाल गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी गणेश नाईक यांना केला आहे. ते नवी मुंबईत बोलत होते. उड्डाणपुलासाठी होणाऱ्या झाडांच्या कत्तली विरोधात आंदोलन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. विशेष म्हणजे वृक्षतोड या एकाच मुद्द्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपा दोघांनीही आंदोलन (Agitation) केले. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. तसेच जो बाळासाहेब आणि शरद पवारांचा झाला नाही, तो नवी मुंबईकरांचा काय होणार, अशी जळजळीत टीका त्यांनी गणेश नाईक यांच्यावर केली आहे.
‘वृक्ष कापायला निवडून दिले काय?’
आव्हाड म्हणाले, की ठराव 2008चा आहे. येथे उड्डाणपूल बांधण्याचा ठराव येथील बादशहा समजणारे नाईक यांचा आहे. आता आम्ही जाहीर केल्यानंतर का ओरडत आहात. आम्ही 15 दिवस आधी मोर्चा काढला म्हणून तुम्हाला आठवले का? पाप मनात खात असते. नवी मुंबईच्या सुजाण जनतेने सत्तेवर आणले ते काय वृक्ष कापायला? जेव्हा ठराव पास केला तेव्हा झाडे नाही दिसली का, असा सवाल करत तो माणूस स्वार्थाचा आहे. त्याने माफी मागायला पाहिजे. कसली नाटके हे करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
नाईकांवर टीका करताना काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
‘नाईक रक्तपिपासू’
गणेश नाईक आणि आयुक्तांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. राजकीय दबावाखाली काम करत असाल तर आएएस होऊन येऊ नका, प्रशासक म्हणून बांगर यांना हे सर्व बाहेर काढायची काय गरज होती? गणेश नाईक तसेच बांगर दोघेही दोषी आहेत. सरळसरळ बोलले जात आहे, की 10 टक्के घेतले, मग या सर्व प्रश्नांची उत्तर द्यावी, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली. आमच्या साहेबांनी त्यांच्यावर अंत्यत विश्वासाने नवी मुंबई सोपवली होती. पण त्याने नवी मुंबईचे रक्त शोषले. त्यांनी सर्व नवी मुंबईकरांची माफी मागावी, अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे.