मराठा आरक्षण, मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आणि विरोधकांची टीका; प्रवीण दरेकर म्हणाले…
Pravin Darekar on Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण, मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आणि विरोधकांची टीका; मराठा आरक्षणावरून विरोधकांचा शिंदे सरकारवर निशाणा, प्रवीण दरेकर काय म्हणाले? वाचा सविस्तर...
नवी मुंबई | 10 सप्टेंबर 2023 : मराठा आरक्षणाचा मुद्दा मागच्या काही वर्षांपासून चर्चेत आहे. मात्र जालन्यातील घटनेमुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही आंदोलक आंदोलन करत असताना त्यांच्यावर लाठीमार झाला. या लाठीमारात हे मराठा आंदोलक जखमी झाले. मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सुरुच ठेवलं. सरकारकडून तीन वेळा प्रस्ताव मांडला गेला. मात्र मागण्या पूर्णत: मान्य न झाल्याने जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं नाही. पण जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या सगळ्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज जरांगे पाटील उपोषण तेरावा दिवस पाणी त्याग केलं आहे. त्यावर बोलताना आम्हाला मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची चिंता आहे. त्यांची प्रकृती उत्तम राहावी, अशीच आम्ही प्रार्थना करतो. सरकार ही सकारात्मक आहे. ते एका विषयावर आग्रही आहेत. त्यासाठी बैठक आम्ही लावली आहे. या विषयावर कायद्याच्या चौकटीत काही अडचण होऊ नये. उद्या कोर्टात ते टिकावं, अशी भूमिका सरकारची आहे. त्यांच्या सगळ्या मागण्या रास्त आहेत. सरकार सकारात्मक आहे. मात्र ज्या ज्या गोष्टी त्यांनी पाठवल्या होत्या, त्या सगळ्या गोष्टी सरकारने मान्य केलेल्या आहेत. त्यात काही गोष्टी असतील तर सरकार त्यावर देखील भर देईल, असं प्रवीण दरेकर म्हणालेत.
आरक्षणावरून विरोधक सरकारवर टीका करत आहेत. त्यालाही प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिलं आहे. विरोधकांचा आरक्षण राजकीय संधी समजून पोळ्या लाटण्याचा प्रकार सुरू आहे. सरकारवर टीका करायला काही उरलं नाही. आरक्षणाचा गोष्टी करताना मुख्यमंत्री किती वेळा होता. तुमच्या नेतृत्वात सरकार किती वेळा होतं. अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते. उद्धव ठाकरे देखील अडीच वर्ष होते. तेव्हा काही वटहुकूम काढला नाही. आता का सांगतायेत? तेव्हा तुमचे हात थरथरत होते का?, असा घणाघात प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
आमचा प्रयत्न प्रामाणिकपणे आहे काल ही आम्ही बैठक घेतली आहे. सर्वपक्षीय बैठकीत आल्यावर त्यांनी उपाय सांगावा. त्यासाठी आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे, असंही दरेकर यांनी सांगितलं.