Navneet Rana : तुरूंगात मारहाण झाली नाही म्हणून राणा दाम्पत्याने सरकारचे आभार मानावे, बच्चू कडुंचा राणांना टोला
आता अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू (Bacchu kadu) यांनी राणा दाम्पत्याला यावरून जोरदार टोला लगावला आहे. तुरूंगात मारहाण झाली नाही म्हणून राणा दाम्पत्याने सरकारचे आभार मानावे, असे विधान बच्चू कडू यांनी केले आहे.
अकोला : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात हनुमान चालीसा पठण (Hanuman Chalisa) आणि मशीदीवरील भोंग्यावरून जोरदार राजकाण सुरू आहे. खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा यांना मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठणाच्या हट्टातून जेलपर्यंत जावं लागलं. त्यावून अजूनही राजकारण शांत झालं नाही. हे प्रकरण आता थेट दिल्लीपर्यंत पोहोचले आहे. मात्र अशातच आता अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू (Bacchu kadu) यांनी राणा दाम्पत्याला यावरून जोरदार टोला लगावला आहे. तुरूंगात मारहाण झाली नाही म्हणून राणा दाम्पत्याने सरकारचे आभार मानावे, असे विधान बच्चू कडू यांनी केले आहे. याबाबत बोलताना बच्चू कडू म्हणाले. प्रामाणिक दादागिरीतूनच शिवसेनेची निर्मिती झाली. शिवसेनेची दादागिरी वायफळ नाही आहे. मातोश्री हे शिवसेनेचे श्रद्धास्थान आहे, प्रेरणा स्थान आहे. तिथे जाऊन तुम्ही अशा पद्धतीने वागता, ही दादागिरी नाही का? असा प्रश्न पालकमंत्री बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याला विचारला आहे. ते जिल्हाधिकारी कार्यालयात बोलत होते.
हनुमान चालीसाचा सात दिवसांचा सप्ताह ठेवा
हनुमान चालीसा देशाचा मुद्दा आहे का? असा प्रश्न उपस्थित करीत पालकमंत्री बच्चू कडू म्हणाले, आपापल्या धर्मातील लोकांनी घरात, मंदीर, मस्जिदमध्ये दहा वेळा त्यांनी म्हणावे. रस्त्यावर येण्याचा हा विषय नाही आहे. रस्त्यावर फडकाविण्याचा विषय असेल तर तिरंगा फडकावा. गरीबांची सेवा करा, रुग्णालयात जा, हनुमान चालीसाचा सात दिवसांचा सप्ताह ठेवा, आम्ही त्यांना वर्गणी देऊ, अशी खोचक टिका पालकमंत्री बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर केली आहे.
तुमच्या घरासमोर कार्यक्रम ठेवला तर चालले का?
बच्चू कडू हे एवढेच बोलून थांबले नाहीत तर ते म्हणाले, तुम्हाला लाज नाही वाटत, अशा पद्धतीने वागता. तुमच्या घरासमोर एखादा कार्यक्रम ठेवला तर चालेल का तुम्हाला. अशा पद्धतीने करणे हे योग्य नाही आहे. मला वाटतं अशी दादागिरी आपण करायची, कोणी केली तर तुम्ही दादागिरी करता, असे आपण म्हणायचं. आम्ही एक थापड मारतो, तुम्ही उभे रहा, असाच त्याचा अर्थ झाला? शिवसेना या मुठीतील नाही आहे. सुदैव तुमचं असं आहे तुम्हाला दणके बसले नाही, तुम्ही त्यातच खुशी माना, असा इशारा पालकमंत्री बच्च कडू यांनी राणा दाम्पत्याला दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याच मुद्यावरून राज्यात जोरादर गदारोळ सुरू आहे. आता बच्चू कडू यांच्या या विधानाने हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.