सांगलीत राजकारण तापलं, रोहित पाटील यांच्यावर फराळासह 3 हजारांच्या पाकिटांचं वाटप केल्याचा आरोप
आजचा दिवस संपला असला तरी राजकारण संपलेलं नाही. विशेष म्हणजे रात्र जसजशी पुढे सरकत आहे, तसतशा आता राजकीय घडामोडींना वेग येऊ लागला आहे. सांगलीच्या तासगावमधून खळबळजनक बातमी समोर आली आहे. राज्याचे दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्यावर अजित पवार गटाचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या समर्थकांनी गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पाटील यांनी पैसै वाटल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे. महायुतीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या समर्थकांनी रोहित पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना पैसे वाटल्याचा गंभीर आरोप केला आहे. रोहित पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरात दिवाळीच्या फराळासह 3 हजार रुपयांचं पाकिट दिल्याचा आरोप संजयकाका पाटील यांच्या समर्थकांनी केला आहे. या आरोपांवर रोहित पाटील यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. माझी जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न आहे, असं रोहित पाटील म्हणाले आहेत.
अजित पवार गटाचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “रोहित पाटील यांची पदयात्रा सुरु होती आणि मागून पैसे वाटप सुरु होते. माजी नगरसेवक सचिन पाटील याच्याकडे पैसेदेखील सापडले आहेत. त्याने स्वत: जबाब दिला आहे. संबंधित परिसरातील 137 घरांमध्ये प्रत्येकी 3 हजार रुपयांच्या पाकिटाचं वाटप केलं जात होतं. रोहित पाटील यांनी काही भाजपच्या कार्यकर्त्यांना फोन करुन काय ऑफर दिली, किती पैशांची ऑफर दिली यांची मी उद्या ऑडिओ रेकॉर्ड ऐकवून पोलखोल करणार आहे”, अशी प्रतिक्रिया संजयकाका पाटील यांनी दिली.
“निवडणूक आयोगाचे नोडल अधिकारी यांना आम्ही बोललो आहोत. निवडणूक आयोगाने या प्रकरणी कारवाई करावी. संबंधित परिसरात 200 ते 250 घरे आहेत. तिथे 400 ते 500 जणांचं मतदान आहेत. रोहित पाटील हे स्वत: त्या ठिकाणी होते. ते पुढे प्रचार करत होते आणि मागून पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरु होता”, असा आरोप संजयकाका पाटील यांनी केला.
रोहित पाटील काय म्हणाले?
दरम्यान, रोहित पाटील यांनी देखील ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “एक गोष्ट तपासावी लागणार आहे, मतदारसंघात गेल्या दोन-तीन दिवसांत कुणी फराळ वाटला आहे, हे मतदारसंघाच्या लोकांना माहिती आहे. हे प्रकरण मला बदनाम करण्यासाठी केलं जात आहे. मला या प्रकरणात बिनकामाचं गोवण्यात येत आहे. माझे वडील आर. आर. आबा हयात असताना सुद्धा विरोधकांनी अशाप्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर आरोप करुन निवडणूक प्रक्रिया गोंधळात टाकण्याचं काम केलेलं आहे. ज्या पद्धतीने त्या व्यक्तीला बुलोरो गाडीत पैशांसह दबाव टाकून बसायला लावलं, माझं नाव घ्यायला लावलं ते व्हिडीओत स्पष्टपणे दिसत आहे. आता दुसरी गोष्ट तपासण्याची आवश्यकता आहे की, मतदारसंघात दोन दिवसांपूर्वी फराळ कोण वाटत होतं? मतदारसंघात चर्चा आहे. त्यामाध्यमातून पैसे वाटले जात असल्याची चर्चा आहे, सापडल्यानंतर आता ते माझं नाव घेत आहेत. याबाबत पोलीस सुद्धा तपास करत आहेत. मी सुद्धा प्रशासनाला विनंती केलेली आहे की, या प्रकरणाची नि:पक्षपातीपणे तपास व्हायला हवा”, अशी प्रतिक्रिया रोहित पाटील यांनी दिली.