Ajit Pawar : तो प्रश्न ऐकताच अजित पवारांचा प्रतिसवाल ‘मग मी काय करु’
"आपल्या राज्यात हा प्रकल्प राबवत असताना सहा पिकं निवडली आहेत. ऊस, कापूस, सोयाबीन, भात, कांदा आणि मका अशी साधारणत: सहा पिकं आम्ही निवडली आहे. AI शेतीसाठी 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे" असं अजित पवार म्हणाले.

आज पुण्यात साखर संकुलात एका बैठकीच्या निमित्ताने अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले होते. त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीत काय चर्चा झाली? त्या बद्दल माहिती दिली. “कृषी क्षेत्रात AI वापरासंदर्भात बैठक झाली. कृषी क्षेत्रात AI चा वापर केल्यास पाणी, खंतांचा वापर कमी होतो. 6 पिकांसाठी एआयचा वापर करणार आहोत” अशी माहिती अजित पवार यांनी दिली. “शेतीमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर केल्याने उत्पादनात वाढ होते. मातीची सुपिकता सुधारते. रासायनिक खतांचा वापर कमी होतो. पाण्याची बचत होते” असं अजित पवार यांनी सांगितलं.
“पंतप्रधान मोदींनी सर्वसामान्यांच घराच स्वप्न साकारलं आहे. 2 कोटी घरांच टार्गेट आहे. पुणे विभागात पिंपरी-चिंचवड, पुणे शहर आणि पुणे ग्रामीणमध्ये मिळून 35 हजार घरांच्या निर्मितीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. वेगवेगळ्या भागात जागा उपलब्ध करुन दिल्या आहेत. या योजनेद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन 80 वर्ष जीवनमान राहणाऱ्या घरांची निर्मिती करण्यात येईल” असं अजित पवार यांनी सांगितलं.
‘मग मी काय करु’
भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे हे काँग्रेससोडून भाजपमध्ये प्रवेश करतायत, असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच, ‘मग मी काय करु’ असा प्रतिसवाल अजित पवारांनी केला. “ते राजकीय पक्षाचे आमदार होते. आता पराभूत झाले. त्यांनी काय करावं तो त्यांचा अधिकार आहे. त्यावर कॉमेंट करण्याचा मला अधिकार नाही” असं अजित पवार म्हणाले.
‘बाकीच्यांनी फार चर्चा करण्याची गरज नाही’
मागच्या पंधरादिवसात शरद पवार आणि अजित पवार हे जय पवारांचा साखरपुडा त्यानंतर आजच्या बैठकीच्या निमित्ताने एकत्र आले. संजय राऊत म्हणाले की, काका-पुतण्या एकत्रच आहेत. त्यावर अजित पवार यांनी उत्तर दिलं.
“साखरपुड्याच्या निमित्ताने कुटुंब म्हणून एकत्र येतात ही महाराष्ट्राची परंपरा आहे. बाकीच्यांनी फार चर्चा करण्याची गरज नाही. हा पवार कुटुंबातील अंतर्गत प्रश्न आहे. पवारासाहेब ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत, तिथे मी ट्रस्टी आहे. मी तिथे उपमुख्यमंत्री म्हणून नाही, रयत शिक्षण संस्थेचा विश्वस्त म्हणून गेलो होतो. शिक्षण क्षेत्रात एआयचा वापर कसा करता येईल? यावर आमची चर्चा झाली” असं अजित पवार यांनी सांगितलं.