अजित पवार यांच्या विधानावरुन राष्ट्रवादीतच मतभेद, शरद पवार थेट माध्यमांसमोर येऊन म्हणाले…..
अजित पवार यांच्या विधानावरुन वाद वाढत असल्याने अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत भूमिका मांडलीय. यावेळी त्यांनी महत्त्वाची भूमिका मांडत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी एक विधान केलं होतं. या विधानामुळे भाजप आणि शिंदे गट आक्रमक झालाय. छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणता येणार नाही. तर ते स्वराज्य रक्षक होते, असं विधान अजित पवारांनी केलं होतं. त्यांच्या या विधानावरुन वाद वाढत असल्याने अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत भूमिका मांडलीय. यावेळी त्यांनी महत्त्वाची भूमिका मांडत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. तसेच अजित पवारही लवकरच आपली भूमिका मांडतील, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय.
“धर्मवीर किंवा स्वराज्य रक्षक यावरुन वाद नको. संभाजी महाराजांना धर्मवीर म्हटलवं तरी अयोग्य नाही. धर्मवीर, स्वराज्य रक्षक या दोन्ही उपाधी योग्य”, असं शरद पवार म्हणाले आहेत.
अजित पवार लवकरच माध्यमांसमोर येतील, अशी देखील माहिती शरद पवार यांनी दिलीय.
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
“धर्मवीर म्हणत असतील आणि धर्माच्या अँगलने पाहत असतील तर त्यांनाही माझी तक्रार नाही. त्या व्यक्तीचं ते मत आहे. त्याला ते मत मांडण्याचा अधिकार आहे. तुम्ही धर्मवीर म्हणा किंवा स्वराज्य रक्षक संभाजी म्हणा, त्याबद्दल माझी कुठलीही तक्रार नाही. ज्याला जो उल्लेख करायचा तो उल्लेख करु शकतो”, असं शरद पवार म्हणाले.
“धर्मवीरबद्दल मला एक काळजी वाटते. मी जेव्हा ठाण्याला जातो तेव्हा काही नेत्यांचा उल्लेख धर्मवीर असा केला जातो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील एकेकाळचे सहकारी होते, त्यांचा उल्लेख ते अनेकदा करतात. त्याबद्दल माझी काही तक्रार नाही. पण त्यांचाही धर्मवीर असा उल्लेख केला जातो”, असंही शरद पवार म्हणाले.
“धर्मवीर असो किंवा संभाजी रक्षक असो, त्या व्यक्तीला संभाजी महाराजांबद्दलची जी आस्था आहे, त्या आस्थेच्या पाठीमागचा जो विचार आहे, त्यासाठी वाद घालण्याचं कारण नाही. धर्मवीर म्हणायचं असेल तर धर्मवीर म्हणा, स्वराज्य रक्षक म्हणायचं असेल तर तसं म्हणा. छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य रक्षणासाठी महत्त्वाची कामगिरी केली”, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.
“जितेंद्र आव्हाड काय म्हणाले ते मी पाहिलं नाही. अजित पवार काय बोलले ते मी पाहिलं. त्यामुळे मी त्याबद्दल उल्लेख केला”, असं शरद पवारानी स्पष्ट केलं.
दरम्यान, रूपेरी पडद्यावर छत्रपती संभाजी महाराज साकारणाऱ्या आणि घराघरांत संभाजी महाराजांचं कार्य पोहोचवणारे कलाकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनीदेखील अजित पवारांच्या विधानावर भूमिका मांडलीय.
“माझी प्रमाणिक भावना अशी आहे की, धर्मवीर ही संकल्पना छत्रपती संभाजी महाराजांना या बिरुदावली पेक्षाही स्वराज्य रक्षक ही बिरुदावली जास्त योग्य आणि संयुक्तिक ठरते. कारण छत्रपती संभाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व इतकं मोठं आहे”, असं अमोल कोल्हे म्हणाले.
“अगदी वयाच्या नऊव्या वर्षापासून ते बिलदानापर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं, या स्वराज्याचं रक्षण करणं ही सर्वात मोठी कामगिरी संभाजी महाराजांनी सातत्याने केली”, असं कोल्हे म्हणाले.
“छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा केवळ धर्मवीर ही संकल्पना लावली जाते तेव्हा केवळ त्यांच्या बलिदानाशी ती संकल्पना जोडली जाते. त्यामुळे केवळ धर्मवीर संकल्पनेपेक्षा स्वराज्य रक्षक ही संकल्पना जास्त व्यापक आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला ही संकल्पना जास्त न्याय देणारी आहे”, अशी भूमिका खासदार अमोल कोल्हे यांनी मांडली.
“छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे फार मोठी प्रेरणा हिंदुस्तानाला दिली. त्यानंतर तब्बल अठरा वर्ष सर्वसामान्य रयत लढली. सरसेनापती संताजी घोरपडे, धनाजी जाधव, छत्रपती राजाराम महाराज असतील, ताराराणी असतील, सगळे लढले, ही लढण्याची प्रेरणा छत्रपती संभाजी महाराजांनी दिली”, असं मत अमोल कोल्हे यांनी मांडलं.