Pawar’s friendship: शरदाच्या दारात तारुण्याचे सदाबहार तोरण, हिरव्यागार दोस्तांचा बहारदार मळा अन् फुलांचे गाव!
ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मलमली तारुण्याचे गुपित म्हणजे त्यांचा मित्रांचा ठेवा. त्यामुळेच ते अजूनही तरुण राजकारण्यांना लाजवेल अशी धमक दाखवतात.
नाशिकः सोलापूरचे सुप्रसिद्ध कवी दत्ता हलसगीकर यांची एक कविताय. ती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार आणि माजी कृषी मंत्री शरद पवार यांना बरोब्बर लागू पडते. त्या कवितेच्या ओळी अशा…
वय झाले असे माझे नाही असे नाही अजूनही फुलांची निमंत्रणे येत असतात मला डोळ्यावरच्या चष्म्याच्याही पलीकडचा हिरवागार बहारदार खुणावतोय मळा
हे असं एकदम काव्यत्म पातळीवर उतरण्याचं कारणही तसंच. कारण वय तब्बल 81 असताना तरुणांनाही लाजवणारा उत्साह पवार साहेबांमध्ये येतो कुठून, असा प्रश्न साऱ्यांनाच पडतो. त्याचे उत्तर म्हणजे त्यांच्या दोस्तांचा गोतावळा. शरद पवार नाशिकच्या दौऱ्यावर होते. यात त्यांनी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. सोबतच आपला प्रिय मित्र प्रख्यात सीए शिवदास डागा यांची आवर्जुन भेट घेतली. आणि त्यांच्या सहस्त्रचंद्रदर्शनाची रौनक अजून वाढली.
64 वर्षांची दोस्ती…
शरद पवार आणि शिवदास डागा यांची दोस्ती तब्बल 64 वर्षांपासूनची. ते दोघेही एकाच वर्गात होते. शिक्षण संपले. सर्वांच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या. या काळात सारे शरीराने दूर गेले. मात्र, मैत्र मनात हिरवेगार, टवटवीत, तजेलदार होत गेले. त्यांचा पाच मित्रांचा ग्रुप. वर्षातून एक भेट ठरलेलीच. ती त्यांनी कधीही चुकू दिली नाही. पवार नाशिक दौऱ्यावर होते. त्यांना डागा यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा असल्याचे समजले. त्यांनी आपल्या व्यापातून डागांच्या घरी भेट दिली. त्यांच्याशी, त्यांच्या कुटुंबाशी वेळात वेळ काढून गप्पा मारल्या. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, माजी आमदार हेमंत टकलेही उपस्थित होते. डागा आणि पवारांचा हा हळवा कोपरा पाहून ते सुद्धा भारावून गेले.
पाच मित्रांचा ग्रुप
शरद पवारांचा पाच मित्रांचा ग्रुप आहे. त्यात नाशिकचे सीए शिवदास डागा, खासदार श्रीनिवास पाटील, सीरमचे सायरस पुनावाला, उद्योजक विठ्ठल मणियार, निवृत्त कर्नल संभाजी पाटील, सेवानिवृत्त सचिव बी. के. अग्रवाल आहेत. हे सारे 1958 ते 1962 या काळात पुण्यातल्या कॉलेजमध्ये शिकायचे. यातल्या कुणाच्याही घरात कार्यक्रम असला की साऱ्यांची हजेरी ठरलेली असते. या साऱ्यांचे अभिनेते दिलीपकुमार आवडीचे. ते त्यांचे मित्रही. हे सारे मिळून त्यांना भेटायला जात. बिलगेट्स यांच्या सोबतही त्यांनी अशीच मैफल रंगवलेली.
कट्यार काळजात घुसली…
नुकत्यात झालेल्या कोजागरी पौर्णिमेला शरद पवारांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा झाला. यानिमित्त या मित्रांनी एका बोटीवर धमाल केली. चार मित्र सोबत. यावेळी कट्यार काळजात घुसली या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण झाले. साऱ्यांनी मिळून ती चांदणी रात्र कार्यक्रम आणि गप्पांमध्ये साजरी केली. शरद पवारांच्या मलमली तारुण्याचे गुपित म्हणजे त्यांच्या मित्रांचा ठेवा. त्यामुळेच ते अजूनही तरुण राजकारण्यांना लाजवेल अशी धमक दाखवतात. दत्ता हलसगीकरांच्या या ओळींप्रमाणेच…
अजून डोळ्यांना उंच आकाश दिसत आहे अजून समर्थ पंखांना क्षितिज पुरत नाही अजूनही छातीमध्ये वादळे भरून येतात
Health Care : फळे खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक, वाचा अधिक!https://t.co/utzB0ZkKLN | #Healthcare | #Water | #dangerous | #Healthcaretips | #lifestyle |
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 15, 2021
इतर बातम्याः
नाशिककरांनो आत्ताच सावध व्हा, ध्वनीप्रदूषणात शहर राज्यात टॉप 10 मध्ये, स्तर चक्क 75.2 डेसीबलवर