अगला स्टेशन चिखलोली… ठाणे ते बदलापूर दरम्यान कुठे होणार नवं स्टेशन ?
मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ठाणे ते बदलापूर दरम्यान आता एक नवं स्टेशन होणार आहे. अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान चिखलोली या नव्या रेल्वे स्थानकाला काही वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली होती.
मयुरेश जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, ठाणे | 15 फेब्रुवारी 2024 : मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ठाणे ते बदलापूर दरम्यान आता एक नवं स्टेशन होणार आहे. अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान चिखलोली या नव्या रेल्वे स्थानकाला काही वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली होती. मात्र या रेल्वे स्थानकासाठी भूसंपादनाची प्रक्रिया आता पूर्ण झाली असून स्थानकाच्या उभारणीसाठी तब्बल ७४ कोटींची निविदा मंजूर करण्यात आली असून लवकरच त्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
त्यामुळे चिखलोली रेल्वे स्थानक लवकरच प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे. स्थानकासाठी भूसंपादनाची प्रक्रिया झाल्यानंतर आता या स्थानकाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यासाठी निविदा देखील मंजूर करण्यात आली आहे. विष्णू प्रकाश पुंगलीया कंपनीला हे काम देण्यात आले असून मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनकडून या कामाची पाहणी केली जाणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी वेळोवेळी केंद्रीय रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार तसेच बैठका घेत पाठपुरावा केला होता.
स्थानकाची नेमकी गरज काय
अंबरनाथ बदलापूर स्थानकातील प्रवाशांची गर्दी कमी होणार आहे. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरातील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची कायम गर्दी असते. याच पार्श्वभूमीवर दोन्ही शहरांच्या मध्यस्थानी चिखलोली रेल्वे स्थानकाची उभारणी करण्यात येत आहे. या स्थानकाच्या उभारणीनंतर अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकावरील प्रवासी भार देखील कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.
याच स्थानकासाठी याआधी 82 कोटीची निविदा काढली होती. चिखलोली रेल्वे स्थानकात जिने, पुल आणि जमिनीच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाकडून ऑक्टोबर महिन्यात ८१.९३ कोटी रुपयांची निविदा जाहीर करण्यात आली आहे. ही निविदा प्रक्रिया मार्गी लागून स्थानकाच्या प्रत्यक्ष उभारणीचे काम सुरू होणार होते. तसेच रेल्वे प्रशासनाकडून फलाट, शेड, पिलर, विद्युत वहिनी आणि इतर कामांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. ही प्रक्रिया पार पडली असून लवकरच ७३.९२८ कोटी रुपयांच्या निधीतून स्थानक उभारणीचे प्रत्यक्ष काम आता सुरू होणार आहे.
कल्याण-बदलापुर तिसऱ्यां-चौथ्या मार्गाला मिळणार गती;
मध्य रेल्वेच्या कल्याण ते बदलापूर स्थानकांदरम्यान तिसऱ्या – चौथ्या नव्या मार्गिकेत येणारे अडथळे दूर झाल्यानंतर आता मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) मार्ग,प्लॅटफॉर्म आणि इतर बांधकामाकरिता नुकताच निविदा मागविल्या आहेत. त्यामुळे कल्याण-बदलापुर तिसऱ्यां-चौथ्या मार्गाला गती मिळणार आहे.
बदलापूर, अंबरनाथ शहरांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दोन्ही स्थानकांतील प्रवासी संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. कल्याण ते बदलापूर स्थानकांदरम्यान दोनच रेल्वे मार्गिका उपलब्ध असल्यामुळे लोकलची संख्या वाढवण्यावर बंधने येतात. त्यामुळे मुंबई रेल्वे विकास महामंडळाने ‘एमयूटीपी ३ अ’मध्ये कल्याण-बदलापूर दरम्यान तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेचे काम हाती घेतले होते. १५ किलोमीटरच्या या मार्गात ४९ पूल, चार रेल्वे उड्डाणपूल प्रस्तावित आहेत. नव्या मार्गिकांसाठी एक हजार ५१० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.२०२६ मध्ये प्रकल्प पूर्ण होणार मार्च २०१९ मध्ये मंजूर झालेला कल्याण-बदलापूर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम पुढील चार वर्षांत होणार होते; मात्र कोरोनामुळे हा प्रकल्प रखडला. कोरोना संपताच या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली.
अशी आहे मार्गिका – खर्च : १,५०९.८७ कोटी रुपये
अंतर : १५ किलोमीटर
– लहान पूल : ४८
– मोठा पूल : १
– रेल्वे उड्डाणपूल : ४
तिसऱ्या- चौथ्या मार्गामुळे कल्याण ते बदलापूर लोकलसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होतील. सध्या मार्गिका नसल्याने कल्याण आणि विठ्ठलवाडी स्थानकात लोकल रखडतात. परिणामी चाकरमांन्याना लेटमार्क लागतो. या मार्गामुळे लोकल वाढल्याने गर्दीचे विभाजन होईल आणि सामान्य प्रवाशांना दिलासा मिळेल.