गोवा, कोकण आणि अहमदाबाद फुल्ल… विमानाचं तिकीट महागलं: थर्टीफर्स्टसाठी नाशिकरांची पसंती कोणत्या शहराला?
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोवा आणि कोकणला मोठ्या प्रमाणात पसंती दिल्याने विमान तिकिटांचे दर तिप्पट झाले आहेत. कोकणातही पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण काही ना काही प्लॅन करत असतात. आता नवीन वर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यातच आता मुलांना शाळेला सुट्ट्या असल्याने अनेकजण कुटुंबासह किंवा मित्रांसह फिरायला जाण्याचा बेत आखतात. सध्या मुंबईसह महाराष्ट्र आणि त्याच्या आजूबाजूची अनेक पर्यटनस्थळं हाऊसफुल्ल झाल्याचे पाहायला मिळत आहे. अलिबाग, गोवा, कोकण, अहमदाबाद, नागपूर यांसह ठिकठिकाणी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे सध्या विमान प्रवास महागल्याचे पाहायला मिळत आहे.
नाशिकमध्ये राहणाऱ्या अनेकांनी नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी गोव्याला पसंती दिली आहे. त्यामुळे विमानाचे तिकीट दर प्रचंड वाढले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी नाशिककरांनी गोवा आणि नागपूरमधील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे नाशिक-गोवा आणि नाशिक-नागपूर या विमान मार्गांवर मोठ्या प्रमाणात प्रवासी संख्या वाढली आहे. गोव्याचे तिकीट दर तीन पटींनी वाढले आहे. त्यामुळे आता एका प्रवासासाठी तब्बल 11 हजार 470 मोजावे लागत आहेत. नाशिक-नागपूर विमान तिकीट देखील 8 हजार 196 वरुन 13 हजार 111 वर पोहोचले आहे.
नाशिकमधील अनेकांची गोव्याला पसंती
नाशिकमधील अनेकांचा गोव्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या मार्गावरची 85 टक्के तिकिटे आधीच बुक झाली आहेत. तसेच अहमदाबादलाही प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. नववर्षाच्या निमित्ताने 4 जानेवारीपर्यंत हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच विमान प्रवासासाठी नाशिककरांची वाढती संख्या उत्तर महाराष्ट्रातील विमानसेवेसाठी उत्साहवर्धक मानली जात आहे.
तर दुसरीकडे नाताळच्या सेलिब्रेशनसाठी आणि विकेंड निमित्ताने अनेक पर्यटक कोकणात दाखल होत आहेत. बहुतांश पर्यटकांनी समुद्रकिनारी मजा-मस्ती करण्याला पसंती दिली आहे. सिंधुदुर्गापासून रायगडपर्यंत जवळपास पाच लाख पर्यटक कोकणात दाखल होणार असल्याचे बोललं जात आहे. सध्या गणपतीपुळ्याच्या समुद्रकिनारी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यामुळे रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे हाउसफुल्ल झाले आहेत.
मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात
मुंबई, पुणे, नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत. आजपासून नाताळपर्यंत अनेक जण मजा मस्ती करण्यासाठी कोकणात दाखल होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. रत्नागिरी, गणपतीपुळे, कर्दे, गुहागर, देवगड, मालवण, तारकर्ली आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना पर्यटकांची पसंती दिली आहे.