राबोडीतील ‘त्या’ कुटुंबाची चार तास कसून चौकशी, मोबाईल जप्त; भिवंडीतील बोरिवली गावातही स्मशान शांतता
NIA raid in Maharashtra: पुण्यातून अटक केलेल्या अतिरेक्यांच्या चौकशीतून महत्वाची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) शनिवारी सकाळी महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये एकाच वेळी 40 हून अधिक ठिकाणी छापे मारले. इसिसचे देशभरातील नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.
मुंबई | 9 डिसेंबर 2023 : राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA च्या छापेसत्रामुळे शनिवारची सकाळ एकदम गडबडीची होती. एनआयए आणि एटीएसच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत आज महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये छापे मारले. इसिसचे देशभरातील नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी एकाच वेळी 40 हून अधिक ठिकाणी छापे मारण्यात आले. शनिवारी एनआयएनने पुणे, ठाणे, मिरा भाईंदर परिसरात धाडी टाकल्या.
याचसंदर्भात NIAने शनिवारी पहाटे ठाण्यातील राबोडी परिसरातही छापे मारले. ठाण्यातील राबोडी परिसरात असलेल्या चांदीवला या इमारतीतील पहिल्या मजल्यावर राहत असणाऱ्या बापे कुटुंबाच्या घरात NIA च्या अधिकाऱ्यांनी पहाटे धाड टाकली. शनिवारी पहाटे चारच्या सुमारास अधिकारी घरात घुसले आणि सकाळी आठपर्यंत त्या सर्वांची कसून चौकशी करण्यात आली.
घर तपासलं, मोबाईलही केला जप्त
बापे कुटुंबातील एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, एनआयए अधिकाऱ्यांनी सर्वांचे मोबाईल तपासले. तसेच घरातही तपास केला, मात्र त्यामध्ये त्यांना काहीच सापडले नाही.ज्यांच्या घरी हा छापा टाकण्यात आला ते अंजुम बापे हे आर्किटेक्ट असून अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील काही कागदपत्रांची तपासणी केली तसेच अंजुम यांचा मोबाईल फोनही एनआयए अधिकाऱ्यांनी तपासासाठी जप्त केला असून ते सोबत घेऊन गेले आहेत.
तसेच अंजुम बापे यांना चौकशीसाठी येण्याची नोटीसही अधिकाऱ्यांतर्फे देण्यात आल्याचे त्यांचा मुलगा असजत याने दिली. त्यांचा मुलगा सध्या कॉलेजमध्ये शिकत असल्याचे समजते. शनिवारी पहाटे अंजुम यांच्या घरी टाकलेल्या छाप्यात NIA आणि ATS चे अधिकारी आणि १० ते १५ स्थानिक पोलीस उपस्थित होते.
दरम्यान NIA ची छापेमारी सुरु असलेल्या भिवंडीतील बोरिवली गावातही भयाण शांतता आहे. चोख पोलीस बंदोबस्तात NIA कडून छापेमारी सुरु आहे.
कशी सुरू झाली कारवाई ?
इसिस प्रकरण पुण्यातून उघड झाले होते. 18 जुलै रोजी दोन पुणे पोलिसांनी दहशतवाद्यांना अटक केली होती. एका मोटारसायकल चोरी प्रकरणातील हे आरोपी होते. त्यानंतर इसिस मॉड्यूलचा धक्कादायक खुलासा झाला. या प्रकरणाचा तपास एटीएसने सुरु केला होता. त्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती पाहून तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) कडे देण्यात आला. त्यानंतर आज पहाटेपासून एनआयएनने पुणे, ठाणे, मिरा भाईंदर परिसरासह राज्यभरात आणि कर्नाटकमध्येही धाड टाकली.
इसिसचे देशभरातील नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. पुणे, ठाणे ग्रामीण, ठाणे शहर, मीरा भाईंदर यासह कर्नाटकात कारवाई केली. ठाणे ग्रामीण येथील भिवंडी भागातील पडघा येथेही छापे टाकण्यात आले. पडघा गाव हे एनआयएच्या रडारवर होतं. पुण्यात सापडलेल्या दहशतवादी प्रकरणानंतर पडघा गावातून दोन ते तीन जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी सकाळी पडघासह विविध ठिकाणी छापे टाकून जवळपास 15 जणांना ताब्यात घेण्यात आलं. त्यामध्ये घाटकोपर बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी साकिब नाचन याचाही समावेश आहे.