नगरची व्हीआरडीई चेन्नईला हलविण्याच्या हालचाली, आमदार निलेश लंकेंनी घेतली पवारांची भेट
नगरची खास ओळख असलेली वाहन संशोधन व विकास संस्था व्हीआरडीई चेन्नईला हलविण्याच्या हालचाली सुरू झालीये.
अहमदनगर : नगरची खास ओळख असलेली वाहन संशोधन व विकास संस्था व्हीआरडीई चेन्नईला हलविण्याच्या हालचाली सुरू झालीये. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी ही संस्था येथून हलविण्यात येऊ नये, यासाठी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी प्रयत्न सुरु केलेत. या निर्णयाची अंमलबजावणी झाली, तर एक मोठी केंद्रीय संस्था राज्याबाहेर जाण्याच्या धोका आहे. (Nilesh lanke meet Sharad pawar over VRDE Nagar)
व्हीआरडीई ही संस्था नगर-दौंड रस्त्यावर आहे. ही संस्था केंद्रीय संरक्षण विभागाच्या अंतर्गत येते. संस्थेच्या देशभरात 52 शाखा आहेत. त्यातील नगरची एक शाखा आहे. नगरच्या शाखेतील प्रयोगशाळेने आतापर्यंत अनेक उपयुक्त संशोधने केली आहेत. संरक्षण विभागासाठी आवश्यक असलेली वाहने आणि अन्य सामुग्री येथे विकसित झाली आहे. याशिवाय वाहनांची तपासणी करून त्यांना प्रमाणित करणारा विशेष ट्रॅकही या संस्थेत आहे.
आता मात्र ही संस्था बंद करून ती चेन्नई किंवा अन्य ठिकाणच्या शाखेत वर्ग करण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती आहे. त्यामुळे स्थानिकांमधून या स्थलांतराला विरोध होण्याची शक्यता आहे. आमदार नीलेश लंके यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना यासंबंधीचं सविस्तर एक निवेदन दिले.
दिल्लीत संरक्षण विभागात प्रयत्न करून ही संस्था नगरमधून जाणार नाही, याची काळजी घ्यावी, नगरमधील एक हजार कुटूंबियाचे यामुळे नुकसान होणार असून त्याचा विकासावरही परिणाम होऊ शकतो, असे लंके यांनी पवारांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय. राष्ट्रवादीबरोबरच शिवसेनेनेही या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
देशाच्या संरक्षण विभागात या संस्थेचे महत्त्व मोठे आहे. नगरमध्ये शेकडो एकर जागेत ही संस्था विस्तारलीय. या संस्थेचे येथून स्थलांतर झाल्यास या जागेचे काय होणार? की या जागेसाठीच स्थलांतर केले जात आहे, असेही प्रश्न उपस्थित केले जात आहे.
VRDE बद्दल महत्त्वाची माहिती
VRDEची स्थापना 1929 ला झाली
आधी ही संस्था पाकिस्तानातल्या रावळपिंडी जवळच्या चखलाला इथं होती.
1947 साली स्वातंत्र्यानंतर अहमदनगरला हलवण्यात आली.
DRDOच्या अंतर्गत ही संस्था काम करते.
भारतातील सैन्य वाहनांच्या चाचणी आणि त्यांना परवानगी इथूनच दिली जाते.
1966 ला चैन्नईच्या अवडीमध्ये या संस्थेचं अजून एक सेंटर सुरु झालं.
सैन्य वाहनांसह देशात बनणाऱ्या इतर वाहनांच्या चाचण्याही अहमदनगरलाच होतात.
(Nilesh lanke meet Sharad pawar over VRDE Nagar)
हे ही वाचा
आमदारांच्या बेडवर कार्यकर्ते, दिलदार निलेश लंकेंची माणुसकी, झोपेतून न उठवता स्वत: सतरंजीवर झोपले!
गावची निवडणूक बिनविरोध करा, 25 लाखांचा निधी मिळवा; आमदार निलेश लंकेंची ऑफर