Nitesh Rane | नितेश यांचा जामीन फेटाळल्यानंतर निलेश आक्रमक; सिंधुदुर्ग कोर्टासमोर हायव्होल्टेज ड्रामा
पोलिसांनी गाडी थांबवली म्हणून निलेश राणे यांच्या रागाचा पारा चढला. त्यांनी यावरून सवाल उपस्थित केला. पोलिसांनी गाडी थांबवल्यानंतर नितेश गाडीतून खाली उतरले आणि कोर्टात गेले. त्याआधी त्यांनी आपल्या वकिलांशीही चर्चा केली.
सिंधुदुर्गः नितेश राणे (Nitesh Rane) यांचा जामीन फेटाळल्यानंतर मंगळवारी सिंधुदुर्ग कोर्टासमोर (Court) हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. नितेश राणे यांचा जामीन फेटाळल्यानंतर भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. यावेळी माजी खासदार निलेश राणे हेही आक्रमक पवित्रा घेताना दिसून आले. त्यामुळे वातावरण तापले. मला कायदा शिकवू नका, अशी आक्रमक प्रतिक्रिया निलेश राणे (Nilesh Rane) यांनी दिली. शिवाय निलेश राणे आणि पोलिसामध्येही बाचाबाची झाली. पोलिसांनी गाडी थांबवली म्हणून निलेश राणे यांच्या रागाचा पारा चढला. त्यांनी यावरून सवाल उपस्थित केला. पोलिसांनी गाडी थांबवल्यानंतर नितेश गाडीतून खाली उतरले आणि कोर्टात गेले. त्याआधी त्यांनी आपल्या वकिलांशीही चर्चा केली. दरम्यान, आता नितेश हे पुन्हा एकदा हायकोर्टात जामिनासाठी अर्ज करणार असल्याचे समजते.
काय झाले कोर्टात?
संतोष परब हल्ला प्रकरणी प्रकरणात वॉरंट निघाल्यानंतर नितेश राणेंनी अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. तिथे त्यांचा जामीन फेटाळण्यात आला होता. त्यानंतर नितेश राणे यांनी हायकोर्टात धाव घेतली. तिथे त्यांना दुसरा मोठा दणका बसला. कारण हायकोर्टानेही नितेश यांना जामीन देण्यास नकार दिला. त्यानंतर राणेंनी शेवटचा पर्याय म्हणून सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मात्र, तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. सुप्रीम कोर्टानेही राणेंचा जामीन अर्ज फेटाळत त्यांना दहा दिवस अटकेपासून संरक्षण देत पुन्हा सत्र न्यायालयाचा रस्ता दाखवला. त्यानंतर राणेंच्या जामीन अर्जावर काल आणि आज सुनावणी पार पडली. मात्र, सत्र न्यायालयानेही राणेंचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
अटकेची तयारी सुरू
संतोष परब हल्ला प्रकरणावरून इथून तिथून सर्वच कोर्टांनी जामीन फेटाळल्यामुळे आता एकीकडे नितेश राणे पुन्हा एकदा हायकोर्टात जायची तयारी करत आहेत. मात्र, दुसरीकडे पोलिसांनी अटकेची तयारी केल्याचे समजते. निलेश राणे यांच्या संरक्षणाचे दहा दिवस संपले की, पोलीस कधीही अटक करू शकतात. त्यावरूनच पोलिसांनी आजही नितेश राणे यांना हटकले. त्यामुळेच त्यांच्या रागाचा पारा चढला आणि कोर्टासमोरच भाजप कार्यर्तेही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
घोषणाबाजीपासून लचांड
नितेश राणे यांनी मुंबई येथे झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात घोषणाबाजी केली. त्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमोर म्यॅव, म्यॅव घोषणा करत त्यांना डिवचले. तेव्हापासून त्यांच्या मागे हे लचांड लागल्याचा आरोप स्वतः नितेश यांनी केला आहे. या घोषणाबाजीनंतर दोन दिवसांतच संतोष परब हल्लाप्रकरणी त्यांना कोर्टाची पायरी चढावी लागत आहे. आता उच्च न्यायालय पुन्हा एकदा या जामिनावर काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
इतर बातम्याः
Wine Capital Nashik | नाशिक वाईन कॅपिटल कसे झाले; ऐतिहासिक ‘पिंपेन’ची कशी झाली सुरुवात?
Nashik | नाशिक क्लायमेट ॲक्शन प्लॅन सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या, काय होणार लाभ?