Nitesh Rane : ‘बेहरामपाड्यात जाऊन तिथे…’, उद्धव-राज ठाकरे संभाव्य युतीवर राणेंची जळजळीत प्रतिक्रिया
"मराठी माणसाची फार लवकर आठवण झाली, मुंबईतून मराठी माणूस हद्दपार झाल्यानंतर. हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी, हिंदुत्वासाठी शिवसेना नावाची संघटना सुरु केली. आता तुम्हाला मराठी माणूस आणि हिंदू समाज आठवला" अशी टीका नितेश राणे यांनी केली.

“महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, वाद या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणं, एकत्र राहणं, यात कठीण गोष्ट आहे, असं मला वाटत नाही. पण विषय फक्त इच्छेचा आहे” असं राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याच्या मुद्यावर म्हणाले. त्यावर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मनसेसोबत युती करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. ‘मी सुद्धा भांडण बाजूला ठेवायला तयार आहे’ असं उद्धव ठाकरे म्हणाले. दोन्ही बाजूंकडून आलेल्या या वक्तव्यानंतर आता ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यावर आता नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“मला एक कळत नाही याने काय फरक पडणार? दोघे एकत्र आले काय, किंवा नाही आले काय? महाराष्ट्रासाठी, हिंदुत्वासाठी कोणी एकत्र येतय का?. हा स्वत:च्या अस्तित्वासाठी एकत्र येण्याचा कार्यक्रम आहे” अशी टीका नितेश राणे यांनी केली. “उद्धव ठाकरे आतापर्यंत जिहाद्यांची बाजू घेत आलेत. आम्ही त्यांना जिहादीह्दयसम्राट बोलतो. म्हणूनच महाकुंभवर टीका करायची आणि उद्धव ठाकरे सारख्या जिहाद्याला खूश करायचं. हिंदुत्वाच्या विरोधात जेवढे जिहादी विचारांचे लोक आहेत. ते एकत्र येऊन हिंदुत्वाला आव्हान देत असतील, तर हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आम्ही भाजप, हिंदुत्ववादी विचारांचे सगळे कार्यकर्ते सज्ज आहोत” असं नितेश राणे म्हणाले.
‘मराठी माणसाची फार लवकर आठवण झाली’
“एकत्र येण्याचा कार्यक्रम हिंदुत्व, मराठी माणसासाठी आहे की, जिहाद्यांना ताकत देण्यासाठी आहे, जे जोर जबरदस्तीने इस्लामीकरण करतात त्यांना ताकत देण्यासाठी आहे. त्या बद्दल स्पष्ट भूमिका असली पाहिजे” असं नितेश राणे म्हणाले.
नळबाजार, मोहम्मद अली रोडवर जा
“हिंदू समाजाच्या विविध घटकांना मारुन हिंदुत्व बळकट होणार आहे का?. एवढा हिंदीच्या सक्तीला विरोध असेल, तर नळबाजार, मोहम्मद अली रोडवर जा. तिथे ऊर्दुची सक्ती बंद करुन मराठीची सक्ती करा. हिंदू समाजाच्या लोकांवर हात उचलता. हिंदू समाजाच्या लोकांवर का हात उचलता. बेहरामपाड्यात जाऊन सांगा. मराठीची सक्ती करा तिथे. हिंदू समाजाच्या लोकांना का मारताय? हिंदूंमध्ये का फूट पाडता? जिहाद्यांना मदत करण्यासाठी, त्यांना ताकद देण्यासाठी” असे प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केले. हे दोन्ही भाऊ एकत्र येतील का? यावर नितेश राणे म्हणाले की, ‘एकत्र येवो किंवा न येवो, आम्हाला फरक पडत नाही’