ठाकरेंच्या हातून ‘शिवसेना’ निसटल्यानंतर नितेश राणे कसे हसले? त्यांनीच शेअर केला व्हिडीओ
उद्धव ठाकरे यांच्यासाठी हे खूप मोठं संकट आहे. पण त्यांच्या या संकटकाळात ठाकरे गटाच्या विरोधकांना खूप मोठा आनंद झालाय. त्यांचा हा आनंद वेगवेगळ्या माध्यमातून समोर येतोय.

मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हातातून अखेर शिवसेना पक्ष आणि त्याचं धनुष्यबाण चिन्ह निसटलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बाजूने निकाल जाहीर केलाय. त्यामुळे हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी सर्वात मोठा झटका आहे. खरंतर उद्धव ठाकरे यांच्यासाठी हे खूप मोठं संकट आहे. पण त्यांच्या या संकटकाळात ठाकरे गटाच्या विरोधकांना खूप मोठा आनंद झालाय. त्यांचा हा आनंद वेगवेगळ्या माध्यमातून समोर येतोय.
भाजप आमदार नितेश राणे यांनी आपल्याला किती आनंद झाला हे सांगण्यासाठी त्यांच्या हसण्याचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केलाय. या व्हिडीओच्या माध्यमातून नितेश राणे उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. आपला हा व्हिडीओ उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवा. आपण किती हसतोय ते त्यांच्यापर्यंत पोहोचवा, असं त्यांनी म्हणत डिवचण्याचा प्रयत्न केलाय.



Pls forward this smiling face to UT n his baby penguin.. Kyunki mujhe block Kiya hoga..
Control nahi hota hai ?? pic.twitter.com/WVENFOFguf
— nitesh rane (@NiteshNRane) February 17, 2023
राणे विरुद्ध ठाकरे असा वाद सर्वश्रूत आहे. हा वाद किती टोकाचा होता ते यातून स्पष्ट होतंय. खरंतर नितेश राणे यांचे वडील नारायण राणे हे शिवसेना पक्षात मोठे झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना राजकारणात संधी झाली. नारायण राणे आपल्या कारकिर्दीत मुख्यमंत्री देखील बनले. पण शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्याचं एकमत झालं नाही. त्यांच्यासोबतचे मतभेद वाढत गेले आणि राणे यांना शिवसेनेला रामराम करावं लागलं. राणेंनीदेखील त्यावेळी मोठं बंड पुकारलं होतं. तेव्हापासून राणे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात बघायला मिळतो.
नारायण राणे यांची प्रतिक्रिया काय?
प्रथम तर माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा अभिनंदन इलेक्शन कमिशनरने त्यांना शिवसेना दिलं आणि धनुष्यवान निशाणी दिली. त्यांचे खूप खूप अभिनंदन. काल शिवसैनिक आणि एवढी वर्ष शिवसेना घडवण्यासाठी जे कष्ट घेतले त्यांना शिवसैनिकांना मिळालेला पुरस्कार आहे, असं नारायण राणे म्हणाले आहेत.
“हा एका व्यक्तीचा, जेव्हा आपलं स्वतःच्या कुटुंबाचा जर शिवसेना म्हणत असेल तर त्यात सिद्ध झालंय ही शिवसेना जे आहे ते शिवसैनिकांनी घाम गाळून निर्माण केली त्यांना हे चिन्ह आणि नाव मिळाले. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे”, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे.