मग मुख्यमंत्री गळ्याला बेल्ट का घालतात? दोन दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर नितेश राणेंच्या सवालाच्या फैरी
आरोग्य व्यवस्थेने ज्या ज्या टेस्ट केल्या, त्या काही खोट्या होत्या का? आताच माझं बीपी चेक केलं, ते 152 आहे, ते काय खोटं असेल काय? कुणाच्याही तब्येतीबद्दल प्रश्न विचारणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभतं का? असे अनेक सवाल राणेंनी यावेळी उपस्थित केले.
कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसांपासून कोठडीत असणारे नितेश राणे (Nitesh Rane bail) आज जामीनावर बाहेर आले. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार प्रहार केलाय. त्यांच्या आजारपणाबद्दल बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील नेत्यांच्या आजारपणाबद्दल प्रश्नांच्या फैरी उपस्थित केल्या आहेत. मला आजही जो त्रास होतोय, याच्याही नंतर कोल्हापूरच्या रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला असला तरी मी एसएसपीएम रुग्णालयात दाखल होणार (Nitesh Rane Health) आहे. मनका, पाठीचा त्रास, शुगर लो होतेय, त्याचा इलाज करणार, पण जे बोलले हा राजकीय आजार आहे, पण आरोग्य व्यवस्थेने ज्या ज्या टेस्ट केल्या, त्या काही खोट्या होत्या का? आताच माझं बीपी चेक केलं, ते 152 आहे, ते काय खोटं असेल काय? कुणाच्याही तब्येतीबद्दल प्रश्न विचारणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभतं का? असे अनेक सवाल राणेंनी यावेळी उपस्थित केले.
मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट का घालतात?
त्यांनी बाहेर येताच थेट मुख्यमंत्र्यांनाही थेट टार्गेट केलंय. प्रश्न आम्हीही विचारु शकतो, जेव्हा सरकार पडण्याची वेळ येते, तेव्हा मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट का घालतात? लतादीदींच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री जातात, त्यावेळी कुठलाही बेल्ट नसतो. अधिवेशनावेळी ते आजारी कसे पडतात? चौकशीवेळीच महाविकास आघाडीतील नेत्यांना कोरोना कसा होतो? कुणाच्याही आरोग्याबद्दल असे प्रश्न विचारणं, किती योग्य आहे? याचा तपासणं गरजेचं आहे. राजकारणाचा स्तर किती खालावू शकतो, यावरही विचार करावा. असा हल्लाबोल राणेंनी यावेली केला आहे. आता मी आराम करणार आहे, दीड महिना मी मतदारसंघात गेलो नाही, गोव्याची जबाबदारी आहे, तिथेही गेलो नाही, तिथेही जाणार आहे. तब्येत सांभाळून मी कामला लागणार आहे. अशी प्रतिक्रिया राणेंनी दिली आहे.
मी सर्व सहकार्य करणार
तसेच न्यायालयाने निर्णय दिला त्याबद्दल त्यांचे आभार, पोलिसांना जी जी मदत हवी होती ती ती मदत मी करत होतो, आणि आताही जीजी मदत लागेल ती मदत मी करेन, सगळ्या अटीशर्थींचं पालन करुन, एओंकडे हजेरी लावून मदत करणार. मी कुठल्याही तपासकार्यातून लांब गेलेलो नव्हतो, जेव्हा जेव्हा संपर्क करण्यात आला, फोन आला, तेव्हा मदत केली, कुठल्याही तपासकार्यात अडथळे आणले नाही, सगळी माहिती देत होतो आणि याही पुढे देणार आहे. मी विधीमंडळाचा सदस्य आहे, 2 वेळा निवडून आलेला प्रतिनिधी आहे, जबाबदारीने वागणं गरजेचं आहे, त्यामुळे कुणीही माझं सहकार्य मागतात, तेव्हा एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी सहकार्य करत होतो. असेही नितेश राणे म्हणाले आहेत.