Obc reservation : केंद्राने इंपिरिकल डेटा न दिल्याने देशातील ओबीसी आरक्षण अडचणीत-छगन भुजबळ
भुजबळ म्हणाले की, ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारने सहकार्य करावे, असे राज्य शासन वारंवार सांगत आहे. केंद्र सरकारकडे असलेला इंपेरिकल डाटा देण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे देशातील ओबीसी आरक्षण अजचणीत आले आहे.
मुंबई : ओबीसींना त्यांच्या हक्कापासून डावलले जाणे ही बाब अतिशय दुर्दैवी आहे. हा प्रश्न केवळ महाराष्ट्राचा नाही तर देशातील सर्व राज्यांचा आहे. दुसऱ्या दिवशी मध्यप्रदेशची याचिका आली त्यांना देखील हाच निर्णय लागू झाला.त्यानंतर ओरिसालाही तोच निर्णय देण्यात आला. त्यानुसार केवळ महाराष्ट्राचे आरक्षण नव्हे तर संपूर्ण देशातील ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने त्या त्या राज्यांना एसइसीसी डेटा द्यावा. इतर राज्यांनी तातडीने केंद्राकडे धाव घेऊन आपली भूमिका मांडावी. राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी सुद्धा केंद्रात जाऊन आपली भूमिका सष्ट करून केंद्र सरकारने तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करून निवडणुका थांबवायला हव्यात. ओबीसींसह सर्व निवडणुका व्हाव्या यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा. त्यांनी हस्तक्षेप केल्याशिवाय यावर मार्ग निघणार नाही असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
ओबीसी आरक्षणावरून विधानसभेत गदारोळ
ओबीसी आरक्षणासंदर्भात विधानसभेत मांडलेल्या विधेयकावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, सन 2010 मध्ये लोकसभेत जातनिहाय जनगणनेच्या विषयावर सविस्तरपणे चर्चा झाली. या ठरावाला भाजपाचे तत्कालिन उपगटनेते स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांनी भारतीय जनता पक्षाचे मत विचारात न घेता संसदेत जाहीर पाठींबा दिला तसेच या मागणीला तत्कालिन संसद सदस्य शरद यादव, मुलायमसिंग यादव, लालूप्रसाद यादव, समीर भुजबळ, व्ही. हनुमंतराव आदी नेत्यांनी पाठींबा देत आपली भूमिका स्पष्ट केली. जातनिहाय जनगणनेच्या मागणीनंतर एसइसीसी 2011 ला हाती घेण्यात आला. मात्र आता केंद्र सरकारने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले की ही जनगणना ओबीसींची नाहीच. जेष्ट विधिज्ञ शेखर नाफडे, मुकूल रोहोतगी, खासदार पी.विल्सन, दुष्यंत दवे आदी निष्णात वकिलांनी तेथे राज्य सरकारची आणि ओबीसींची बाजू मांडली. असेही भुजबळ म्हणाले.
केंद्राने इंपेरिकल डेटा देण्यास नकार दिला
भुजबळ म्हणाले की, ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारने सहकार्य करावे, असे राज्य शासन वारंवार सांगत आहे. केंद्र सरकारकडे असलेला इंपेरिकल डाटा देण्यास त्यांनी नकार दिला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील डेटा मागितला त्यांना देखील तो दिला नाही. आधी सांगितले की, त्या डेटामध्ये चुका आहेत, मात्र संसदीय समितीच्या अहवालात म्हटले आहे की, ९८.८७ टक्के डाटा बरोबर आहे. आता मात्र केंद्र सरकारने तो डाटा ओबीसीचा नाहीच असे म्हटले. एवढे वर्ष कधीच केंद्राने ओबीसीचा डेटा नाही म्हटले मात्र आता त्यांनी हा डेटा ओबीसीचा नाही असे म्हटले आहे. आज महाराष्ट्रातील आरक्षण गेले. त्यानंतर मध्यप्रदेश येथील पंचायत राज मधले आरक्षण गेले.काल ओडिशा राज्यातील आरक्षण गेले. लवकरच कर्नाटक, गुजरात, उत्तरप्रदेश सह देशभरातील पंचायत राज संस्थांमधील ओबीसी आरक्षण स्थगित होणार आहे. आज संपुर्ण देशच ओबीसी आरक्षणाच्या धक्क्याने ग्रस्त आहे देशभरातील ओबीसींना सामाजिक न्याय व घटनात्मक संरक्षण नाकारून कसे चालेल ? ओबीसींना घटनात्मक आरक्षण दिले तरच 54 टक्के असलेल्या या वर्गाला न्याय मिळेल असे यावेळी छगन भुजबळ म्हणाले.
राज्य सरकारने आयोगाला निधी दिला
ते म्हणाले की, राज्य सरकारने ट्रिपल टेस्ट साठी समर्पित आयोग गठीत करून या आयोगाला निधी दिला आहे. त्यानुसार कामही होणार आहे. मात्र हे सेन्ससचे काम असल्याने त्यालाही कोर्टात चॅलेंज होऊ शकते. ओबीसींच्या मुळावर उठलेले लोक पुन्हा एकदा कोर्टात जाऊ शकतात. त्यामुळे केंद्रानेच हे काम करण्याची आवश्यकता आहे. याच्यावर मुळापासून औषध शोधण्याची आवश्यकता आहे. राज्यसरकार आपले पुरेपूर प्रयत्न करत आहे. न्यायालयाने ट्रीपल टेस्टची पूर्तता करण्याच्या सूचना केलेल्या आहे. त्यानुसार ओबीसींच्या फक्त राजकीय परिस्थितीचे सर्वेक्षण करण्यास वेळ लागणार नाही. मात्र ते कोर्टात टिकणार नाही. त्यासाठी ओबीसींची सर्वांकष आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सर्व स्तरातील माहिती घेणे आवश्यक आहे. त्यासाठी अधिकचा वेळ लागणार असल्याने केंद्र सरकारने आता हस्तक्षेप करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.औरंगाबाद हाय कोर्ट खंडपीठाने व सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारच्या या अध्यादेशाला स्थगिती दिलेली नाही त्यामुळे आता हे विधेयक मंजूर केले जावे असे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.