अंतराळातून काय आलं? आगीचे गोळे की… चंद्रपुरात नेमकं काय पडलं?; इस्त्रोने जे सांगितलं ते विस्मयकारक
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या वर्षी आगीचा गोळा आला होता. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. काही लोकांनी या उल्का असल्याचं म्हटलं होतं. तर काहींनी हा आगीचा गोळा म्हणजे धूमकेतू असल्याचं म्हटलं होतं.
चंद्रपूर : वर्षभरापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात आकाशातून काही वस्तू पडल्या. आश्चर्यकारक अशा या गोष्टी होत्या. ते आगीचे गोळे असल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे चंद्रपुरात एकच खळबळ उडाली होती. एलियन्सचा हा हल्ला तर नाही ना? किंवा आकाशातील एखाद्या ग्रहावरून काही पडलेलं तर नाही ना? अशी चर्चा यावेळी सुरू झाली होती. चंद्रपुरातील या घटनेकडे जगभरातील शास्त्रज्ञांचं लक्ष वेधलं होतं. इस्रोनेही या प्रकाराची दखल घेतली होती. इस्रोने आता याबाबत मोठं विधान केलं आहे. आकाशातून पडलेल्या वस्तू दुसरं तिसरं काही नसून चीनच्या सॅटेलाईटचे तुकडे आहेत, असं इस्रोने म्हटलं आहे.
हे तुकडे चीच्या लॉग मार्च सॅटेलाईटचे आहेत. वर्षभरापूर्वी हे तुकडे पडले होते. आगीच्या गोळ्यासारखे झेपावत ते खाली आले होते. चंद्रपुरात हे आगीचे गोळे पडले होते. चंदपूरच्या सिंदेवाही आणि चंद्रपूर तालुक्यात आकाशातून आगी सारख्या काही वस्तू पडल्या होत्या. त्यात रिंग सारखी एक मोठी वस्तू होती. त्यासोबतच फुग्याच्या आकाराचे काही तुकडेही सापडले होते. आकाशातून या वस्तू पडल्यानंतर चंद्रपूरसह महाराष्ट्रात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
इस्रोच्या पथकाचे संशोधन
या घटनेनंतर इस्रोचं एक पथक सिंदेवाही येथे पोहोचलं होतं. या टीमने या सर्व वस्तू ताब्यात घेतल्या होत्या. त्याची तपासणी केली. त्यानंतर आज वर्षभरानंतर इस्रोने त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आकाशातून पडलेले हे तुकडे चीनच्या लॉग मार्च सॅटेलाईटचे तुकडे आहेत, असं इस्रोने म्हटलं आहे. त्यामुळे ही कोणतीही आवकाशीय घटना नसल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी चंद्रपूरचे सुरेश चोपाने इस्रोच्या संशोधकांच्या संपर्कात होते. चीनच्या लॉग मार्चच्या सॅटेलाईटचे हे तुकडे आहेत. इस्रोकडून तसा अहवाल भारत सरकारला दिला आहे, असं चोपाने यांनी म्हटलं आहे.
गुजरातमध्येही तेच दृश्य
गेल्यावर्षी जेव्हा हे आगीचे गोळे पृथ्वीच्या दिशेने आले तेव्हा तो धूमकेतून असू शकतो असं सांगितलं गेलं होतं. त्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली होती. गुजरातच्या नवसारी, डांग, पाटन, दाहोद, खेडा आदी ठिकाणी आकाशात अशा गोष्टी पाहायला मिळाल्या होत्या. रामेश्वर मंदिराच्या जवळ ही अद्भूत घटना दिसली होती. सुरुवातीला वाटलं नववर्षाची आतषबाजी असेल. नंतर ही अवकाशीय घटना असल्याचं दिसून आलं, असं एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं. तर काही लोकांनी या उल्का पिंडा असाव्यात असं म्हटलं होतं. आवकाशात 30 सेकंद पर्यंत हे दृश्य पाहायला मिळालं. त्यातून निळा आणि पिवळा प्रकाश निघताना दिसत होता.
भयावह आवाज आला
चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी गावात एक लोखंडाची रिंग कोसळली होती. जेव्हा ही रिंग कोसळली तेव्हा लोक आपल्या घरात होते. अचानक भयावह आवाज ऐकल्याने लोक घाबरून घराच्या बाहेर आले. तेव्हा त्यांना आकाशातून आगीचा गोळा जमिनीवर येताना दिसला. हा आगीचा गोळा जमिनीवर कोसळला. तो अत्ंयत तप्त होता. हा आगीचा गोळा कोसळल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कळवण्यात आलं. त्यानंतर पोलीस आणि त्यांनी हा आगीचा गोळा थंड केला आणि तो पोलीस स्टेशनला घेऊन गेली होती.