राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, लॉकडाऊन लागणार का? काय खबरदारी घ्यावी, टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती
राज्यात हा पहिल्चा रुग्ण आढळल्यामुळे सरकार तसेच प्रशासनाकडून कोणती खबरदारी घेण्यात येणार, लॉकडाऊन लागणार का, परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी आणखी वेगळी नियमावली लागू करण्याची गरज आहे का ? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधत या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
मुंबई : कर्नाटक, गुजरात या राज्यांनतर आता महाराष्ट्रातदेखील कोरोनाचे नवे रुप अर्थात ओमिक्रॉन या विषाणूने शिरकाव केला आहे. डोंबिवलीत कोरोनाचा नवा रुग्ण आढळलाय. राज्यात हा पहिलाच रुग्ण आढळल्यामुळे सरकार तसेच प्रशासनाकडून कोणती खबरदारी घेण्यात येणार, लॉकडाऊन लागणार का, परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी आणखी वेगळी नियमावली लागू करण्याची गरज आहे का ? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधत या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्यांनी सध्यातरी कोणतेही निर्बंध लागू करण्याची गरज नसल्याचे सांगितले आहे. तसेच नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियम पाळावेत असे आवाहन त्यांनी केले आहे.
पहिल्या, दुसऱ्या लाटेच्या अनुभवानुसार खबरदारी
टीव्ही 9 मराठीशी बोलताना टोपे यांना येणाऱ्या काळात काही निर्बंधांची गरज आहे का असे विचारण्यात आले. त्यावर बोलताना केंद्र सरकारकडून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसदर्भात अभ्यास केला जात आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा जो अनुभव आहे, त्यानुसार आता खबरदारी घेण्यात येत आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली.
नागरिकांनी पॅनिक होण्याची गरज नाही
तसेच ओमक्रॉन विषाणूचा संसर्ग लहान मुलांमध्ये वेगाने होत असल्याचे म्हटले जात आहे. त्यावर बोलताना तज्ज्ञांनी, टास्क फोर्सने, तसेच आयसीएमआरने कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. ओमिक्रॉन विषाणूची आपल्याकडे प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटना तसेच आयसीएमआर सूचना देतील. पण राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव झाला असला तरी पॅनिक होण्याची गरज नाही, असे टोपे म्हणाले.
लॉकडाऊन लागणार का ? नवे निर्बंध लागणार का ?
सध्यातरी कोणतेही नर्बंध लावण्यावर विचार नाही. पण सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनाची लस घेणे गरजेचे आहे. पहिला तसेच दुसरा डोस घ्यावा. परदेशातून येणाऱ्या लोकांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. जोखीम असलेल्या देशातून प्रवाशी येत असतील तर त्यांची चाचणी केली जात आहे. त्यांना आठ दिवसांसाठी क्वॉरन्टाईन केले जात आहे. तसेच गृहविलगीकरणदेखील केले जात आहे. केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार हे सगळे केले जात आहे, असे टोपे यांनी सांगितले.
इतर बातम्या :