Omicron Variant : राज्यात ओमिक्रॉनचा फैलाव वाढला! मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत बैठक, राज्यात पुन्हा कडक निर्बंध?
टास्क फोर्ससोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे सण-उत्सव लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल, तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीने विस्तृत चर्चा करण्यात आली.
मुंबई : महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा (Omicron) फैलाव वाढत असल्याचं राज्य सरकारची डोकेदुखी आणि नागरिकांसाठी चिंता वाढली आहे. राज्यात आज ओमिक्रॉनचे 23 नवे रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि टास्क फोर्सची (Task Force) बैठक झाली. राज्यातल्या कोविड रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर या बैठकीत चर्चा झाली.
टास्क फोर्ससोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे सण-उत्सव लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल, तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीने विस्तृत चर्चा करण्यात आली. याबाबत उद्या म्हणजे 24 डिसेंबर रोजी रोजी नवी नियमावली जाहीर करण्यात येईल असं ठरल्याचं कळतंय.
अन्य राज्य, युरोप, अमेरिकेतील कोरोना स्थितीचा अभ्यास
दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत इतर राज्यांनी लावलेल्या निर्बंधांवर, तसेच युरोप, अमेरिकेत कोरोनाची वाढत्या संख्येवर चर्चा करण्यात आली. मुख्य सचिव देवाशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार डॉ दीपक म्हैसेकर, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, टास्क फोर्सचे डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ अजित देसाई, डॉ राहुल पंडित आदींनी सहभाग घेतला व सूचना केल्या.
राज्यात आज 23 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद
राज्यात आज ओमिक्रॉन रुग्णांची उच्चांकी नोंद झाली आहे. आज दिवसभरात ओमिक्रॉनची लागण झालेले 23 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तशी माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. या 23 रुग्णांपैकी 13 रुग्ण एकट्या पुण्यातील आहेत. मुंबईत 5, उस्मानाबादेत 2 आणि ठाणे, मीरा-भाईंदर आणि नागपुरात प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. आज आढलून आलेल्या 23 नव्या रुग्णांमुळे राज्यातील ओमिक्रॉनची एकूण रुग्णसंख्या 88 वर पोहोचली आहे. त्यामुळे राज्यात ओमिक्रॉनचा फैलाव आता वेगानं होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
#Maharashtra #COVID19 Updates for today
▶️No. of new cases of #OmicronVariant reported in the state, today – 23
(#Pune-13, #Mumbai – 5, Osmanabad- 2, Thane-1 Nagpur-1, Mira-Bhayandar – 1)
▶️Total #Omicron cases reported in state till date – 88
District-wise breakup?
(1/6) pic.twitter.com/GIXJM4Hrjd
— PIB in Maharashtra ?? (@PIBMumbai) December 23, 2021
राज्यात कोणत्या जिल्ह्यात ओमिक्रॉनचे किती रुग्ण?
मुंबई – 35 पिंपरी-चिंचवड – 19 पुणे ग्रामीण – 10 पुणे शहर – 6 सातारा – 3 कल्याण-डोंबिवली – 2 उस्मानाबाद – 5 बुलडाणा – 1 नागपूर – 2 लातूर – 1
इतर बातम्या :