रत्नागिरी-नागपूर महामार्गावर भीषण अपघात, दोन ट्रक समोरासमोर भिडले अन्…
रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकची धडक झाली. अपघाताचे नेमके कारण काय याचा तपास सुरु आहे. पोलीस आणि रेस्क्यू टीमने घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरु केले.
सांगली : रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकचा भीषण अपघात झाला. ट्रकचा चालक जागीच ठार तर क्लीनर अपघातग्रस्त ट्रकखाली अडकला आहे. बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. एक ट्रक अॅसिड वाहतुकीचा आणि दुसऱ्या ट्रक फरशी वाहतूक करणारा आहे. अपघात झाल्यानंतर या दोन्ही ट्रक सुरक्षा कठडे तोडून शेतामध्ये पडल्याने ट्रकच्या चक्काचूर झाला आहे. अॅसिड वाहतूक करणारा ट्रक चालक जागीच ठार झाला आहे तर त्याचा सहकारी अपघातग्रस्त ट्रकमध्ये अडकला आहे. मयत चालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात
रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग वड्डी गावाजवळ अपघातात सहा जणांचा बळी गेला होता. नेमक्या त्याच ठिकाणी आज मालवाहतूक करणाऱ्या दोन ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. अपघात पहाटेच्या सुमारास झाल्याच्या स्थानिक नागरिकांनी सांगितले. दोन्ही ट्रक कर्नाटक पासिंग असून, हा अपघात नेमका समोर समोर झाला की ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात झाला हे मात्र नेमके समजू शकले नाही. अपघात घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्स टीम तसेच पोलीस दाखल झाले असून, ट्रकखाली अडकलेल्या क्लिनरला वाचवण्याचा प्रयत्न सुरू केले.
सुदैवाने क्लिनर बचावला
अॅसिड वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून बॅरल राष्ट्रीय महामार्गावर पडल्याने वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे. आकाश माळी राहणार बसवकल्याण कर्नाटक हा या अपघातातून सुदैवाने बचावला आहे. महादेव रुग्णवाहिका स्पेशल रेस्क्यू फोर्स तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला ट्रकच्या बाहेर काढण्यात आले आहे.