अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घ्यावे, अमोल मिटकरी यांनी सांगितलं कारण
बळीराजासाठी दिलासा देणाऱ्या काहीतरी गोष्टी करा, असा सल्ला अमोल मिटकरी यांनी दिला.
अकोला : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आज शेतावर जाऊन दिवाळीचा काही वेळ घालविला. अमोल मिटकरी म्हणाले, माझी सरकारला विनंती आहे. हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईतचं घेण्यात यावं. नागपुरात अधिवेशन घेण्यात यावं, असा करार आहे. पण, विदर्भातील शेतकऱ्यांची यंदा अत्यंत वाईट परिस्थिती आहे. एका अधिवेशनाचा चारशे-पाचशे कोटी रुपये खर्च येतो. त्याऐवजी तो पैसा कापूस उत्पादक शेतकरी, तूर उत्पादक शेतकरी यांना ते पाचशे कोटी रुपये देण्यात यावे. यंदा शेतकरी हवालदील झाला आहे. अधिवेशनासाठी खर्च होणारे चारशे-पाचशे कोटी रुपये हे विदर्भातील शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी द्यावे.
अमोल मिटकरी म्हणाले, मी एक शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला माणूस आहे. मला असं वाटतं की यंदा शेतकरी संकटात आहे. मुख्यमंत्र्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देत असताना यंदा शेतकऱ्याची दिवाळी अंधारात आहे. यंदासारखं नुकसान राज्याच्या इतिहासात कधी झालं नाही.
शेतकऱ्याच्या घरात आनंद नसेल तर तुमच्या दिवाळीच्या शुभेच्छ्यांना काय अर्थ आहे. अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा आलेला नाही. सोयाबीन परतीच्या पावसानं सगळं संपवून टाकलं. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसण्याचं तुम्ही काम करता. हेच का तुमचं हिंदुत्व, असा सवाल अमोल मिटकरी यांनी राज्य सरकारला विचारला.
अब्दुल सत्तार कृषिमंत्री आहेत. थोटीतरी शिल्लक असेल, तर बळीराजासाठी दिलासा देणाऱ्या काहीतरी गोष्टी करा, असा सल्ला अमोल मिटकरी यांनी दिला.
डुकर, रोही, वन्यप्राण्यांपासून पिकांचं नुकसान होतं. कुंपनासाठी 80 टक्के अनुदानावर मदत करा. यामुळं शेतीचं नुकसान कमी होईल. शेतकरी आनंदित होईल, असंही मिटकरी म्हणाले.
सदावर्ते यांच्या बोलण्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. सदावर्ते हा भाजपची कळसुत्री आहे. राहुल गांधी यांच्या यात्रेला लाखोचा प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात आता अत्यंत अस्वस्थता माजली आहे. त्यामुळे भाजप सदावर्तेसारख्या लोकांना पुढे करत आहे. सदावर्तेला मी व्यक्ती मानत नाही ती एक प्रवृत्ती आहे.