Akola Ayurveda | पातूरच्या आयुर्वेद महाविद्यालयाच्या बगिच्यात गांजाची शेती! पोलिसांच्या पथकाकडून 142 झाडे जप्त
आयुर्वेद महाविद्यालयात तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत. त्यांना याबाबत कसं कळलं नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आपल्या महाविद्यालय परिसरातील बगिच्यात कोणती झाडं आहेत. त्यांचा उपयोग काय, याची माहिती महाविद्यालय प्रशासनाला कशी कळली नाही, हे न समजणारं कोडचं आहे.
अकोला : जिल्हातल्या पातूर येथील ढोणे आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या (Dhone Ayurvedic College) परिसरातील बगिच्यामधून गांजाची 4 लाख रुपये किमतीची 142 झाडे सापडलीत. अकोला जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने ही झाडे जप्त केली आहेत. पातूर येथील ढोणे आयुर्वेदिक महाविद्यालयातील सुरक्षा रक्षक प्रकाश सुखदेव सौंदळे गांजाची शेती करत होता. प्रकाशनं प्रशासनाच्या ( Administration) डोळयात धुळफेक करीत येथील बागेत गांजाची बेकायदेशीररीत्या शेती केली. अशी माहिती पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) जी श्रीधर यांच्या विशेष पथकाला मिळाली. या माहितीवरून पथकाने पाळत ठेवून छापेमारी केली. या छापेमारीत तब्बल 142 गांजाची झाडे लावून याच ठिकाणावरून गांजाची अवैधरीत्या विक्री सुरु करण्यात आल्याचे यावेळी समोर आले. पोलिसांनी आरोपीस अटक केली. त्याच्याविरुध्द पातूर पोलीसमध्ये एनडीपीएस ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाविद्यालय प्रशासनाचे लक्ष नाही काय?
आयुर्वेद महाविद्यालयात तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत. त्यांना याबाबत कसं कळलं नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आपल्या महाविद्यालय परिसरातील बगिच्यात कोणती झाडं आहेत. त्यांचा उपयोग काय, याची माहिती महाविद्यालय प्रशासनाला कशी कळली नाही, हे न समजणारं कोडचं आहे. सुरक्षा रक्षक स्वतःच्या हिमतीवर एवढी मोठी रिस्क कशी घेऊ शकतो, असे अनेक प्रश्न यानिमित्तानं उत्पन्न झाले आहेत.
गांजाच्या कुरियर सेवेवरही नजर
पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी भंडारा जिल्ह्यात येणाऱ्या पार्सलवर करडी नजर ठेवण्याचे आदेश नुकतेच दिलेत. अवैध वस्तूचे पोस्टाने अथवा कुरियरचे पार्सल करताना आढळल्यास कडक कारवाईच्या ही सूचना दिल्या आहेत. शहरात गांजा, अफू यासारखे अमली पदार्थ विक्री करणारे रॅकेट सक्रिय आहे. कुरियर आणि पोस्टाच्या सहाय्याने या पदार्थांची तस्करी असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. असं कुरियर सेवा देणारे कपिल हेडाऊ यांनी सांगितलं. जिल्ह्यातील सर्व पार्सलवर आणि कुरियर सेवावर करडी नजर राहणार आहे. त्यामुळे अशाप्रकारे तस्करांच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण पाच तर छोटे 17 असे जिल्ह्यातील 22 कुरियर सेवांवर चौकशी मोहीम सुरू केली आहे. शिवाय संबंधित कुरियर मालकांना इशारावजा नोटीस पाठविण्यात आले आहे. या पोलिसांच्या धडक मोहिमेमुळे आता अवैध वस्तूची ने-आण करणाऱ्या तस्करांचे धाबे दणाणले आहेत. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे जयवंत चव्हाण यांनी दिली.