मुख्याध्यापकाची महिलेस शिविगाळ; महिलेने भर रस्त्यात असा दिला चोप
गर्दी जमा झाली आहे. एक महिला एका व्यक्तीला मारहाण करत आहे. काठी घेतली आणि शिविगाळ करत काठीने चांगलाच चोप देत आहे.
चंद्रपूर : रंगपंचमीच्या दिवशी दारूच्या नशेत महिलेला मोबाईलवर अश्लील शिवीगाळ करणे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर खाडे याला चांगलेच महागात पडले. त्या महिलेने खाडे याला भररस्त्यात पकडून चप्पल आणि काठीचा प्रसाद दिला. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळा येथील हा प्रकार आहे. मुख्याध्यापक ज्ञानेश्वर खाडे हे 2018 पासून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, ताडाळा येथे कार्यरत आहेत. तसा त्यांचा कार्यकाळ वादग्रस्तच राहिलाय. त्यांच्या अनेक तक्रारी शिक्षण विभागाकडे गेल्या आहेत. धुलीवंदनाच्या दिवशी सायंकाळी ताडाळा येथे जाऊन या महाशयाने एका महिलेला भ्रमणध्वनीवर अश्लील शब्दात शिवीगाळ केली. यामुळे संतापलेल्या महिलेने त्याला रस्त्यात गाठून चप्पल आणि काठीने बदडून काढले. या प्रकारचा व्हीडीओ आता व्हायरल झाला आहे. या मुख्याध्यापकाला तातडीने सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी गावकरी करीत आहेत.
व्हिडीओत नेमकं काय?
या व्हिडीओत ग्रामीण भागातील चित्र आहे. ताडाळा येथील गावातील हे दृश्य आहे. गर्दी जमा झाली आहे. एक महिला एका व्यक्तीला मारहाण करत आहे. काठी घेतली आणि शिविगाळ करत काठीने चांगलाच चोप देत आहे. तेवढ्यात तिथं कुणीतरी व्यक्त येतो. त्या महिलेला अडवतो. तसेच एक छोटी मुलगी महिलेला मारहाण करण्यापासून थांबवते. पण, महिलेला पारा चांगलाच भडकला आहे. आतापर्यंत मी साधेपणाने राहिली. आता माझा हा रूप पाहा, असंही ती त्या व्यक्तीला सुनावते. ती व्यक्ती मुख्याध्यापक असल्याची माहिती आहे. गावातील लोकं हा सर्व प्रकार पाहत आहेत.
व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल
मुख्याध्यापक हा मद्यधुंद अवस्थेत असावा, असे दिसते. कारण महिला मारहाणा करत असताना तो पडून आहे. कोणत्याही प्रकारचा प्रतिकार करण्याची त्याच्यात शक्ती नाही, असं एकंदरित या व्हिडीओत दिसते. हा व्हिडीओ गावातील कुणीतरी काढला. त्यानंतर तो व्हायरल करण्यात आला. या व्हिडीओची चर्चा चांगलीच सुरू झाली. संबंधित मुध्याध्यापक हा वादग्रस्त असल्याची माहिती आहे.