आईला तालुक्याच्या ठिकाणी जातो म्हणून सांगितले, चार दिवसांनंतर जीवनचा मृतदेहच सापडला
पोलिसांनी आज त्याचा मृतदेह सापडल्याचे सांगताच जीवनच्या आईच्या पायाखालची वाळू सरकली. जीवनच्या बाबतीत नेमके काय झाले, हे अद्याप काही कळले नाही.
निलेश डाहाट, प्रतिनिधी, चंद्रपूर : जीवन तोगरे हा समाजसेवेचा विद्यार्थी. चार दिवसांपूर्वी आईला तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे जिवती येथे जातो, असे सांगितले. त्यानंतर जीवन घरी परतला नाही. आईने मोबाईल लावला. पण, तो स्वीच ऑफ दाखवत होता. जीवनच्या मित्रांना तसेच नातेवाईकांकडून विचारपूस करण्यात आली. पण, जीवन काही गेली चार दिवस सापडला नाही. पोलिसांनी आज त्याचा मृतदेह सापडल्याचे सांगताच जीवनच्या आईच्या पायाखालची वाळू सरकली. जीवनच्या बाबतीत नेमके काय झाले, हे अद्याप काही कळले नाही. पण, जीवनच्या आईने एका प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत.
जंगलात झाडाखाली सापडला मृतदेह
चंद्रपूर जिल्ह्यातल्या जिवती तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ता जीवन तोगरे (रा. पाटागुडा ) 24 हा युवक गुरुवार पासून बेपत्ता होता. घरच्यांनी तीन दिवसांपासून त्याची नातेवाईक आणि मित्र परिवाराकडे शोधाशोध केली. मात्र शेणगाव आणि मरकागोंदीच्या मधील जंगलात एका झाडाखाली नागरिकांना त्यांचा मृतदेहच आढळला.
जीवन हा समाज सेवेचा पदवीधर होता. त्याने अनेक रक्तदान शिबिरे आयोजित केली होती. तो रुग्णाच्या सेवेला धाऊन जाणारा युवक होता. आईला तालुक्याच्या ठिकाणी आता जाऊन येतो म्हणून सांगून तो घरून निघाला होता. मात्र आज त्याचा मृतदेह सापडला.
दोन दिवसांपूर्वी जीवनविरोधात तक्रार
दोन दिवसांपूर्वी एका महिलेने दोघात वाद झाल्याने जीवनवर पोलीस स्टेशन जीवती येथे तक्रार केली होती. त्यामुळे आमच्या मुलाची हत्याच आहे, याचा तपास व्हावा. अशी मागणी जीवनचे नातेवाईक आणि समाज बांधवांकडून केली आहे.
जीवनसोबत त्याची कागदपत्रे आणि त्याचा बंद मोबाईल सापडला आहे. शवविच्छेदन हे घटना ठिकाणी झाले आहे. त्याचा अहवाल दोन दिवसांत पूर्ण होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. घटनेचा अधिक तपास पिटीगुडा उपपोलीस स्टेशनची चमू करीत आहेत.