अनंत अंबानींकडून दोन कोटी, शिर्डीत ऑक्सिजन प्रकल्प सुरु, मुख्यमंत्री म्हणाले, आता घरच्या घरी टेस्ट करण्यावर लक्ष
साई संस्थानने हा प्रकल्प उभारुन साईबाबांनी दिलेली मानवतेची आणि गोरगरीबांना अडचणीच्या काळात मदतीची शिकवण जपली असल्याचं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाचं उद्घाटन करताना व्यक्त केलं.
अहमदनगर : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांना साईबाबा विश्वस्त संस्थानच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आणि आरटीपीसीआर प्रयोगशाळेमुळे बळकटी येणार आहे. साई संस्थानने हा प्रकल्प उभारुन साईबाबांनी दिलेली मानवतेची आणि गोरगरीबांना अडचणीच्या काळात मदतीची शिकवण जपली असल्याचं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाचं उद्घाटन करताना व्यक्त केलं. कोरोना गेला तरी काही वर्ष कोरोना टेस्ट सुरू ठेवाव्या लागतील. घरच्या घरी कोरोना टेस्ट करता आली पाहिजे यावरही लक्ष केंद्रीत करावे लागेल, असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं (CM Uddhav Thackeray inaugurates Oxygen plant in Sai trust hospital Shirdi).
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था संचलित श्री साईबाबा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती सयंत्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण. तसेच आरटीपीसीआर प्रयोगशाळेचे कार्यान्वयन संपन्न. राज्यासाठी आवश्यक ऑक्सिजन निर्मिती राज्यातच करण्यास प्राधान्य. pic.twitter.com/6jr5frqwg7
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 18, 2021
प्लॅन्टची क्षमता 1200 लीटर प्रति मिनिट, 300 बेडला ऑक्सिजन पुरवठा होणार
साईबाबा सामान्य रुग्णालय शिर्डी येथे मेडीकल ऑक्सिजन निर्मिती सयंत्राचे लोकार्पण आणि आरटीपीसीआर प्रयोगशाळेचे उद्घाटन आज (18 मे) दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. या प्रकल्पासाठी रिलायंस फाऊंडेशनने 2 कोटी तर चेन्नई येथील दानशुर साईभक्त के.व्हि रमणी यांनी 43 लाख रुपये देणगी म्हणून दिले आहेत. संस्थानच्या वतीने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाद्वारे हवेतून ऑक्सिजन निर्मिती केली जाणार आहे. सदर प्लॅन्टची क्षमता 1200 लीटर प्रति मिनिट आहे. त्यामुळे साईनाथ रुग्णालयातील 300 बेड करीता ऑक्सिजन पुरवठा होणार आहे, अशी माहिती संस्थानचे सीईओ कान्हूराज बगाटे यांनी दिली.
शिर्डीतील ऑक्सिजन प्रकल्प पर्यावरण पुरक, 24 तास कार्यरत राहणार
हा प्रकल्प पर्यावरण पुरक असुन तो 24 तास कार्यरत राहणार आहे. त्याकरीता कोणत्याही कच्च्या मालाची आवश्यकता लागणार नाही. या प्रकल्पासाठी रिलायन्स फांऊडेशनतर्फे अनंत अंबानी आणि साईभक्त व्ही. रमणी यांनी आर्थिक सहाय्य केले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या प्रकल्पाचा उदघाटन सोहळा पार पडला. यावेळी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ यासह राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते.
तिसऱ्या लाटेत आवश्यक आरोग्य सुविधांनी युक्त असले पाहिजे
उद्धव ठाकरे म्हणाले, “कोरोनाच्या पहिल्या लाटेचा आपण सामना केला. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसते आहे. मात्र, तिसर्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. अशावेळी आपण त्यासाठी आवश्यक आरोग्य सुविधांनी युक्त असले पाहिजे. त्यामुळेच अशा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना चालना देण्याचे आणि प्रोत्साहन देण्याचे धोरण राज्य शासनाने ठरविले आहे.”
एकीकडे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असताना एखाद्या धार्मिक संस्थानच्या माध्यमातून ऑक्सिजन प्लांट उभे करणारं साईबाबा देवस्थान कदाचित पहिलंच धार्मिक स्थळ आहे.
हेही वाचा :
संगम स्टीलने देवळीमध्ये 21 दिवसांत उभारला ऑक्सिजन प्लान्ट, वैद्यकीय वापरासाठी मोफत ऑक्सिजन
पुणे महापालिकेला जमतं ते तुम्हाला का जमत नाही? झोपा काढत होता का?, चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला सवाल
पीएम केअर फंडातून महाराष्ट्राला ऑक्सिजन प्लांटसाठी एका नवा पैसा मिळाला नाही, भाजप नेत्यांनी माफी मागावी : काँग्रेस
व्हिडीओ पाहा :
CM Uddhav Thackeray inaugurates Oxygen plant in Sai trust hospital Shirdi