“खारघर घटनेला शिंदे-फडणवीस सरकारच जबाबदार”; काँग्रेस नेत्याने पुन्हा भाजपवर तोफ डागली
अजित पवार भाजपमध्ये जाणार यावर बोलताना त्यांनी सांगितले की, अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे की, ते कायम राष्ट्रवादीसोबत असणार आहेत.
संगमनेर /अहमदनगर : खारघर दुर्घटना घडल्यापासून काँग्रेसने भाजपवर आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल चढविला आहे. अगदी पहिल्या दिवसांपासून काँग्रेसने या प्रकरणी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आताही काँग्रेसकडून गंभीर आरोप करत काँग्रेसच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता पुन्हा एकद काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमात उष्माघाताने मृत्यू पडलेल्या घटनेला शिंदे-फडणवीस सरकारच जबाबदार असल्याचा गंभीर आरोपही बाळासाहेब थोरात यांच्याकडून करण्यात आला आहे.
या दुर्घटनेमुळे तातडीने विधिमंडळाचे दोन दिवसीय अधिवेशन बोलवून चर्चा करण्यात यावी अशी मागणी प्रदेश काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिंदे-फडणवीस सरकार जास्त काळ टिकणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे शिंदे गटातील 16 आमदार अपात्र ठरणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
त्यामुळे सध्या कौन बनेगा मुख्यमंत्री असं वक्तव्य नाना पटोले यांनी केले होते. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयचा निर्णय लवकरच येऊ शकतो. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र झाल्यास सरकार पडू शकते.
हे सरकार कोसळणार असल्यामुळे सध्या कौन बनेगा मुख्यमंत्री ही चर्चा होणं स्वाभाविक आहे अशी खोचक प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली.
आमदार बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर टीका करताना म्हणाले की, केंद्रातील भाजपचे सरकार हे सुडाचे राजकारण करत आहे. अगदी 2014 नंतर भाजप सरकार सत्तेत आल्यापासून सुडाचे राजकारण सुरू करण्यात आले आहे.
लोकशाहीत सत्ताधारी आणि विरोधी असे दोन्ही पक्ष एकत्र असतात मात्र भाजपकडून सत्तेत आल्यापासून सूडाचे राजकारण करण्यात येत आहे अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
यावेळी त्यांनी बोलताना भाजपचे पंतप्रधान अटल बिहार वाजपेयीही पंतप्रधानहोते. त्यांनीही कधी अशा प्रकारचे राजकारण केलं नव्हतं असंही त्यांनी यावेळी सांगितले. राहुल गांधी यांच्या प्रकरणावरून बाळासाहेब थोरात यांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
बाळासाहेर थोरात यांनी बोलताना आशिष देशमुख आणि चंद्रशेखर बावनकुळे भेटीबद्दलही बोलताना म्हटले की, त्या दोघांच्या भेटीला जास्त महत्व देण्याची गरज नाही. तर सरकार कोसळणार याविषयी सातत्याने संजय राऊत यांच्याकडून वक्तव्य केली जातात त्यावर बोलताना थोरातांनी सांगितले की, खासदार संजय राऊत दिल्लीत असतात त्यामुळे त्यांना बऱ्याच गोष्टी समजतात.
तसेच सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लवकरच अपेक्षित असल्याने त्या पार्श्वभूमीवर त्यांची वक्तव्य असावी असंही त्यांनी यावेळी सांगितले.
तर दुसरीकडे अजित पवार भाजपमध्ये जाणार यावर बोलताना त्यांनी सांगितले की, अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे की, ते कायम राष्ट्रवादीसोबत असणार आहेत. त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याचं काहीही कारण नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तर अजित नवले यांच्या आंदोलनाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी शेतकरी आणि कामगारांचे विषय घेऊन काम करतोय याचा आनंद आहे. मात्र त्यांच्या हेतूबद्दल किंवा प्रश्नांबद्दल अजिबात शंका नाही.
मात्र त्यांचे आंदोलन मंत्र्याच्या घरावर घेऊन जाणे हे मनाला पटत नाही. तेच आंदोलन त्यांनी प्रांत किंवा जिल्हाधिकारी कार्यालयावर लाँगमार्च काढावा एवढीच अपेक्षा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.